Blackbuck Poaching Case काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरल्यास सलमान खानला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाऊ शकते. मात्र, सलमानसह अन्य आरोपींनाही तिच शिक्षा दिली जाईल, असे वकिलांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सलमानसह सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांना देखील सहा वर्षांची शिक्षा होणार का,  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी काळवीटची शिकार केली होती. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जर सलमान या प्रकरणात दोषी आढळला तर उर्वरित आरोपी देखील दोषी ठरु शकतात. त्या सर्वांना समान शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात किमान १ वर्ष आणि जास्तीत जास्त सहा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे, असे वकिलांनी सांगितले.