News Flash

BLOG : आजही दादा कोंडके जोरात?.. होय!

दादा चित्रपट प्रमोशनच्या बाबतीत काळाच्या केवढे तरी पुढे होते

दादांचे चित्रपट सर्वकालीन लोकप्रिय असल्याचा रंग कायम राहिलाय...

dilip-thakurशीर्षक वाचून तुमचे कुतूहल जागे झाले असणारच आणि असे कुठे घडतंय, का घडतंय वगैरे वगैरे प्रश्नांची महामालिका तुमच्या मनात एव्हाना सुरु देखील झाली असेल. दादा कोंडके आपल्या हयातीतही काही वेळेस दंतकथेचे नायक ठरत तसेच आताही काही आहे की काय अशीही तुमच्या मनात शंका आली असेल. तशीच एक छानशी गोष्ट येथे सांगायलाच हवी त्यातून दादा चित्रपट प्रमोशनच्या बाबतीत काळाच्या केवढे तरी पुढे होते हे लक्षात येईलच पण तेव्हाची त्यांची अनेक प्रकारची पेरणी आज त्यांच्या चित्रपटाच्या पथ्यावर पडतेय वाटते अशी एक सकारात्मक भावनाही तुमच्या मनात येईल. उषा चव्हाण दादांची हुकमी नायिका पण ‘ह्योच नवरा पाहिजे’साठी (१९८०) काही कारणास्तव उषा चव्हाणचा होकार नव्हता. दादांनी तेव्हा कशी हुशारी दाखवली माहित्येय? जयश्री टीने अमेरिकेवरुन या चित्रपटासाठी होकार दिला अशी बातमी त्यानी गाजवली. तेव्हा अमेरिका खूपच दूर वाटायची आणि इतक्या दूरवरून एक अभिनेत्री दादाना होकार देते म्हटल्यावर मराठी चित्रपट रसिकांना त्याचे विशेष कौतुक वाटणारच. दादांबाबतचे असे किती तरी किस्से, गोष्टी, कथा, दंतकथा, विनोद आणि त्यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गीत संगीत नृत्ये या गोष्टींवर त्यांची आजही कायम आठवण येते हे तुम्हीदेखील अधूनमधून अनुभवत असाल. १४ मार्च १९९८ ला दादांचे निधन झाले. म्हणजेच त्यानंतर चित्रपट रसिकांची किमान दीड पिढी काळ पुढे गेला. पण तरीही दादा कोंडके इतिहासजमा झाले नाहीत हे विशेषच!

आता ते कसे ते बघा,

तुमचे कधी मध्य मुंबईतील लालबाग परळ भागात जाणे होत असेल तर भारतमाता चित्रपटगृहावर सहज नजर टाका. कधी तुम्हाला तेथे ‘आली अंगावर’ झळकलेला दिसेल तर कधी ‘तुमचं आमचं जमलं’, पांडू हवालदार, सोंगाड्या असाच एकदा दादांचाच चित्रपट प्रदर्शित झालेला दिसेल. सोंगाड्या १९७१ चा चित्रपट म्हणजे चित्रपटाला तब्बल ४५ वर्षे झालीत. त्यातही तो कृष्ण धवल चित्रपट. आजच्या डिजिटल पिढीच्या चित्रपट रसिकांकडून त्याला प्रतिसाद मिळावे असे काय आहे? पण काही प्रमाणात का होईना पण भारतमातावर युवा पिढी दिसते. यशस्वी चित्रपट पुढील पिढीचेही आकर्षण ठरतात असे नेहमीच कौतुकाने म्हटले जाते त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय हा असा येतो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विविध भागातील एकपडदा चित्रपटगृह; जत्रांतील तंबू थिएटर, टूरिंग टॉकीज येथेही दादांचा एकटा जीव सदाशिव अथवा सासरंच धोतर असा एकादा जुना चित्रपट झळकलेला दिसेल. मागच्याच डिसेंबर महिन्यात नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणे एकदमच थंडावले असता दादांच्याच चित्रपटांचा अनेक एकपडदा चित्रपटगृहांचा आधार ठरलाय ही वस्तुस्थिती आहे.

मराठीत कधीही रिपीटरन संस्कृती नव्हती. साठ सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटाबाबत रिपीटरन व मॅटिनी खेळ ही संस्कृती खूप जोरात होती. एकदा प्रदर्शित होऊन गेलेला चित्रपट काही काळानंतर थोडीफार प्रसिद्धी करून पुन्हा झळकवणे म्हणजे रिपीट रन व तो सकाळच्या साडेअकराच्या खेळाला कमी असलेल्या तिकीट दरात प्रदर्शित करणे म्हणजेच मॅटीनी खेळ हे तुमच्यातील पन्नाशीच्या आतबाहेर असणार्‍यांना एव्हाना चांगलेच आठवले असेल. त्यानी या काळाच्या गोष्टींवर पुढील पिढीशी गप्पा करताना त्यात अनेक हिंदी चित्रपटांची नावे घेतली असतील. पण मराठीचे काय? मराठीत फक्त आणि फक्त दादा कोंडके यांचाच रिपीट रन चित्रपटात दबदबा राहिलाय. दादांच्या चित्रपटात द्वैर्थी संवाद असतात; त्यांच्या चित्रपटातील कथा म्हणजे गोधडी असते अशी कितीही व कशीही टीका झाली तरी त्याचा दादा व त्यांचे चित्रपट यावर कोणताही परिणाम झाला नाही. ज्या काळात मराठी चित्रपट भारतमाता, प्लाझा आणि पश्चिम महाराष्ट्र याच वर्तुळात फिरत होता तेव्हाच दादांचा चित्रपट मराठवाडा विदर्भातील चित्रपटगृहातही झळके. त्याचे श्रेय दादांच्या चित्रपटाची वितरण व्यवस्था सांभाळणारे विजय कोंडके यांनाही आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचलेला दादांचा चित्रपट आजही आपले आकर्षण टिकवून आहेत यात चित्रपट सोहळे व उपग्रह वाहिन्या यांचाही महत्वाचा वाटा आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यात दादांच्या चित्रपटातील गाण्यावर झक्कास नृत्य असते वा दादांची मस्त मिमिक्री तरी असते. आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो याचाच अर्थ आजचा रसिक दादांच्या मनोरंजनाशी जोडला गेलाय. चित्रपट येतात व गल्ला पेटीवर काही कोटींचा व्यवसाय करून जातात या पलिकडे जाऊन त्याचे अस्तित्व व प्रभाव असतो तो हा असा. उपग्रह वाहिन्यांसाठी दादांचे सर्वच चित्रपट उपलब्ध नाहीत. पण जे आहेत त्यांच्या प्रक्षेपणाच्या वेळेस ग्रामीण भागात त्या वाहिनीला टीआरपी उत्तम मिळतोय. अगदी दादा कोंडके स्पेशल सोहळ्यातील आजच्या पिढीतील कलाकारांची नृत्येही पाहण्यास प्रेक्षक विशेष रस घेतात. काय ग सखू बोला दाजिबा, मळ्याच्या मळ्यामदी कोण ग उभी, काल रातीला सपान पडलं, ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं अशी दादांची अनेक गाणी सर्वकालिन लोकप्रिय आहेत. त्यातील काही गाण्यांचे रिमिक्स देखील लोकप्रिय आहेत. याच गाण्यावरील वाद्यवृंदाचे मुंबई पुणे अशा शहरापासून ग्रामीण भागातील खेळाना चांगलेच यश मिळतय. एका काळातील चित्रपट पुढील काळात जात राहण्याची ही विविध माध्यमे आहेत व त्याचीही दखल घ्यायला हवीच. येथेही दादा कोंडकेच आघाडीवर आहेत म्हणजे काही चित्रपटवाल्यांच्या यशाला काळ व माध्यम यांच्या मर्यादा नसतात हेच खरे. याचे मूल्यमापन करणारा तराजू वा कॅलक्युलेटरही नाही. हे सगळेच एकमेकांत गुंतलय व अचंबित करणारे असे आहे. दादांचे चित्रपट पुन्हा पुन्हा आजही प्रदर्शित होतात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्हालाही माहित्येय ‘दंगल’ च्या स्पर्धेत एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पण दादांचा चित्रपट भारतमातामध्ये दररोज एका खेळासाठी का असेना पण प्रदर्शित झाला.

चित्रपटगृहातून उतरलेला मराठी चित्रपट आता दूरदर्शन अथवा एकाद्या उपग्रह वाहिनीवर पहायचाय या मानसिकतेत मराठी चित्रपट रसिक जसा आहे तसाच चित्रपटसृष्टीचा दृष्टिकोन एकदा थिएटरमधून मराठी चित्रपट उतरला की तो पुन्हा प्रदर्शित करण्याची गरज नाही असाच आहे. तो पूर्वापार असल्यानेच तो का बरे तसा आहे असाही प्रश्न करता येत नाही. कधी ‘सामना’ चित्रपटाला चाळीस वर्षे झाली म्हणून त्याचा एकाद्या चित्रपट सोसायटीच्या वतीने आवर्जून खेळ आयोजित केला जातो. असे काही जुने व दर्जेदार मराठी चित्रपट आजच्या पिढीतील रसिकांसमोर आणणे त्या निमित्ताने त्यावर चर्चा घडवून आणणे हे चित्रपट सोसायटी गांभीर्यपूर्वक घेते. कधी काही चित्रपट महोत्सवात काही जुने मराठी चित्रपट पाहायचा योग येतो. पण त्याचे व्यावसायिक प्रदर्शन करणे मराठीत कधीच रुळले व रुजले नाही. साठ सत्तरच्याच दशकात त्याची सुरुवात व्हायला हवी होती. काळाच्या ओघात व खास करुन मल्टीप्लेक्स संस्कृतीत हिंदीचेही मॅटीनी खेळाचे युग आठवणीपुरतेच राहिलय. पण एडवर्ड सारख्या अनेक एकपडदा चित्रपटगृहात आजही जुने चित्रपट रिपिट रनला प्रदर्शित होतात व अस्सल चित्रपट व्यसनी पुन्हा पुन्हा जुना आवडता चित्रपट आणखीन एकदा तेथे पाह्यला मिळेल म्हणून हमखास जातो. मराठी चित्रपटालाही हे भाग्य लाभावे अशा दर्जेदार चित्रपटांची मराठीला कधीच कमतरता नव्हती. गरज मात्र व्यावसायिक दृष्टिकोनातून या माध्यमाकडे पाहण्याची होती. पिढी बदलूनही त्यात मागच्या काळातील चित्रपट पुढील काळात जात राहिला असता. दादा कोंडकेप्रमाणेच इतरही अनेक मराठी चित्रपटांवरचे त्यांचे प्रेम चित्रपटगृहातून कायम पुढे सुरु राहिले असते. आता ते एकाद्या वाहिनीवर खूप जुना चित्रपट वा एकादे गाणे पहाताना कायम राहते. वा अन्य कारणास्तव पूर्वीच्या मराठी चित्रपट वा कलाकारांबाबतच्या यशाच्या गोष्टी जाणून घेत राहते.

त्यात दादा कोंडके, त्यांचे बरे वाईट चित्रपट; त्यातील गाणी आणि त्यांच्याबद्दलचे असंख्य किस्से, दंतकथा याला कंटाळा तो नाहीच. तेच सगळे दादांचा आजही पुन्हा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटगृहाकडे आकर्षित करते. प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे यावे यासाठीच तर आज अनेक मराठी चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत रंग भरला जातोय ना? दादांचे चित्रपट सर्वकालीन लोकप्रिय असल्याचा रंग कायम राहिलाय… लालबागला कधी गेलात तर भारतमातावर नजर टाका अथवा एकाद्या जत्रेतील तंबू थिएटरकडे वळा, अधूनमधून तुम्हाला दादा कोंडकेंचा चित्रपट पुन्हा पाह्यला मिळेल. त्यात पुन्हा पाहण्यासारखे काय बरे आहे याचे उत्तर कदाचित मिळणार नाही…. तेच दादांचे मोठे यश आहे. ते अशा यशाच्या रुपाने हयात आहे म्हणायचे.
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:20 pm

Web Title: blog by dilip thakur dada kondke
Next Stories
1 ‘बेवॉच’ चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये पाहा प्रियांकाचा खलनायकी चेहरा
2 ओम पुरींच्या डोक्याला मार आणि खांद्यालाही फ्रॅक्चर; शवविच्छेदनात झाला खुलासा
3 Happy Birthday: हृतिकला डान्समधून मिळालेली पहिली कमाई जाणून व्हाल थक्क
Just Now!
X