20 February 2019

News Flash

BLOG : ‘गुलाबजाम’निमित्त फिल्मी खाद्य संस्कृती…

लक्ष्मीकांत बेर्डे जुहू-वर्सोवा परिसरात शूटिंग असताना घरुन जेवणाचा मोठा डबा मागवे.

चित्रपटसृष्टीतील खाद्य संस्कृती अशी चौफेर व चविष्ट.

‘गुलाबजाम’ हा मराठीतील पहिला खाद्य-चित्रपट. पण या चित्रपट व्यवसायातील पडद्यामागची अथवा प्रत्यक्षातील खाद्य संस्कृती कमालीची, अनेक चवी आणि स्वादाची आहे. शूटिंगच्या वेळेच्या सकाळ व संध्याकाळचा नाश्ता यापासून सेटवरच्या जेवणापर्यंत येथे बरेच काही आहे.

सीमा देव यांनी एकदा ‘फ्लॅशबॅक’मध्ये जात सांगितले, पूर्वी कोल्हापुरात जयप्रभा अथवा शांतकिरण स्टुडिओत एकाच वेळेस दोन मराठी चित्रपटांचे चित्रीकरण असताना दुपारच्या जेवणाच्या वेळेस दोन्ही चित्रपटातील कलाकारांसह तंत्रज्ञ व कामगार एकत्र जेवण घेत आणि एकमेकांची ख्याली खुशाली समजे. कलाकारांच्या काही कौटुंबिक सुखदु:खाच्या गप्पा गोष्टी होत. ‘माणूस म्हणून एकमेकांना समजून घेतले जाई’. सीमाताईंच्या या बोलण्यातच पूर्वीच्या मराठी चित्रपटातील कौटुंबिक आणि भावनिक दृश्ये खरी का वाटतात याचेच नकळत उत्तर मिळते. कौटुंबिक हिंदी चित्रपट हे तर राजश्री प्रॉडक्शन्सचे सुपर हिट वैशिष्ट्य. त्यांच्या सेटवर शुध्द शाकाहारी जेवण तेदेखील वेळेवर व व्यवस्थित हे त्यांच्या चित्रपटात भूमिका करणारे कलाकार आवर्जून सांगणार. अन्यथा सेटवरचे ते भरपूर तेल असणारे जेवणच नको म्हणून घरूनच डबा नेणारे कलाकार खूप. तब्येत सांभाळण्याचा एक मार्ग पोटातून जातो हे मनावर बिंबवलेले कलाकार घरुनच सॅलड व हलके जेवण नेतात. राजेश खन्नाचे सेटवरचे जेवण खूपच वेगळा अनुभव. त्याच्या चित्रपटाच्या सेटवर जाण्याचा योग येई तेव्हा दिसे, तो साडेबारा एकच्या सुमारास येतो व पटकन तयार होऊन कॅमेर्‍यासमोर येई. तोपर्यंत सेटवर मोठे टेबल मांडले जाऊन बरेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ आपल्या सुगंधाने अस्तित्व दाखवू लागलेत. दिग्दर्शकाने लंच ब्रेक म्हणताच मेकअप उतरवत राजेश आपल्या काही जोडीदारांसोबत जेवणाच्या टेबलावर येणार व त्याचा मूड झक्कास असेल तर अगोदर तो आजूबाजूला कोणी ओळखीचा पत्रकार वा अन्य कोणी आहे का पाहणार व अगदी आवर्जून विचारणार, ‘आपने खाना खाया?…’ आपण काही बोलण्यापूर्वीच तो प्लेट घ्यायला सांगणार.

लक्ष्मीकांत बेर्डे तर जुहू-वर्सोवा परिसरात शूटिंग असताना घरुन अनेक प्रकारचे मासे असणारा जेवणाचा मोठा डबा मागवे. लक्ष्या हसतखेळत एखादा विनोद करत सर्वांसोबत सुरमई, कोलंबी वगैरे फस्त करे. वर्षा उसगावकार आपली गोव्यातील भरपूर मासे खाण्याची सवय मुंबईतही कशी जपलीय हे रंगवून सांगणारच. मराठीतील इतरही कलाकार एखाद्या दिवशी घरून काही विशेष पदार्थ आणत/आणतात. मराठी चित्रपटसृष्टीत खेळीमेळीचे वातावरण आहे असे म्हणतात यामागचे एक कारण हेदेखील आहे. ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटाच्या पुण्यातील प्रीमियरनंतर लग्नाच्या हॉलमध्ये जिलेबीचे जेवण होते.

तर राखी गुलजार आपल्या हिंदी चित्रपटाच्या आऊटडोअर्स शूटिंगच्या वेळेस एखाद्या दिवशी आपले काम नसेल तेव्हा युनिटसाठी जेवण बनवण्याचा भरपेट आनंद घेई. आपण अगोदर एक व्यक्ती आहोत आणि मग स्टार आहोत याचे तिला भान असे. राजकुमार तर लंच ब्रेकमध्ये एक तास आराम करण्यासाठी ओळखला जाई. सायरा बानूने एक संगीत सिरियल निर्माण केल्याच्या निमित्त आपल्या पाली हिलवरील बंगल्यावर आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना ‘उंची खाना’ दिला तेव्हा दिलीपकुमारची मेहमान नवाझी थक्क करणारी होती पण आम्हाला ‘हे खा, ते खा’ असा प्रेमळ आग्रह धरणारा दिलीपकुमार मात्र स्वतः चुकूनही काही खात नव्हता हे जास्तच लक्षात राहिले.
चित्रपटाच्या सेटवर एखादी अभिनेत्री एखाद्या हिरोच्या व्हॅनिटीत जेवणासाठी वारंवार जाऊ लागली की त्यांच्यात काही तरी शिजतेय असे गॉसिप्स गरम होऊ लागते. हे पूर्वापार शिजत आलेले सत्य आहे. कधी एखादा हिरो सेटवरच एखाद्या अभिनेत्रीला ‘शामको साथ मे डिनर करते है’ असे सांगतो/ सुचवतो याचा खरं तर काहीच अनर्थ काढण्याची गरज नसते. ‘दिल चाहता है’च्या सेटवर सैफ अली खान असेच सोनाली कुलकर्णीला म्हणताच ती गोंधळली व आपण याबाबत कसे कन्फ्युज झालो हे तिने काही मुलाखतीत सांगताच हा किस्सा खूप रंगला. ‘सरफरोश’साठी सोनाली बेन्द्रेची उंची आमिर खानपेक्षा जास्त ठरणार नाही ना हे कुठे पाहिले माहित्येय? दिग्दर्शक जॉन मॅथ्यूजने आपल्या घरी खाना आयोजित करुन या दोघानाही बोलावले व एकत्र उभे केले आणि मगच ‘हो’ असा निर्णय घेतला हे सोनालीकडूनच समजले.

चित्रपटसृष्टीतील खाद्य संस्कृती अशी चौफेर व चविष्ट. पूर्वी अंधेरीच्या नटराज स्टुडिओतील कॅन्टीनमध्ये गेल्यावर मुंबईतील कोणत्या स्टुडिओत कोणते व कोणाचे शूटिंग चाललयं याचे तपशील मिळत व कुठे जायचे हे ठरवता येई. का माहित्येय? कारण तेथूनच सर्व स्टुडिओत जेवण जाई. या गोष्टी खूप छोट्या वाटतात पण ही चित्रपटसृष्टी अशीच गुंतलीय. विदेशातील शूटिंगच्या वेळेस मुंबईतून आचारी नेला जातो. तेथील स्थानिक पदार्थ कधीतरी ठीक हो. अवधूत गुप्तेचे काही वेगळेच आहे. तो इव्हेंट्स निमित्त ज्या देशात जाईल तेथील पदार्थ टेस्ट करतोच. मालिकांचे जग विस्तारताना सेटवरची खाद्य संस्कृती अधिकच विस्तारली. युनिटमध्ये किचन शेड मस्ट झाली. अनेक महामालिका दोन चार वर्षे वा अधिक काळ सहज चालतात. त्याही एकाच बंगल्यात/ स्पॉटवर वगैरे. त्यासाठीच युनिटमध्ये जेवणावळ हवीच. दररोज एकत्र काम करताना कलाकारांत जवळीक वाढत जाताना एकमेकांच्या खाण्याच्याही आवडी/ सवयी समजतात व सुकन्या कुलकर्णीसारखे उत्साही कलाकार ते जपतातही. आणखीन एक विशेष, चित्रपट असो वा मालिका त्यात राज्याच्या व देशाच्याही विविध भागातून आलेले कलाकार एकत्र काम करतानाही कधी कधी आपापल्या गाव/ शहर/ राज्य येथील खाद्य पदार्थ वैशिष्ट्यांची सहज गप्पांत जाणीव करून देता देताच एखाद दिवशी कधी गुजरातचा ढोकळा वा बंगालची मिठाई सेटवर येते आणि मूड झक्कास बनतो. तेच तर महत्त्वाचे आहे.
दिलीप ठाकूर

First Published on February 13, 2018 2:00 pm

Web Title: blog by dilip thakur gulabjam marathi movie filmy food culture