News Flash

BLOG : चित्रपटांची जत्रा आणि बरेच काही…

पणजीत सुरु असलेला भारताचा सत्तेचाळीसावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे एकूणच या महोत्सव संस्कृती व परंपरा यावर ‘फोकस’ टाकण्याची संधी आहे. इतकी की, बर्लिन वा व्हेनिस

dilip-thakurपणजीत सुरु असलेला भारताचा सत्तेचाळीसावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे एकूणच या महोत्सव संस्कृती व परंपरा यावर ‘फोकस’ टाकण्याची संधी आहे. इतकी की, बर्लिन वा व्हेनिस चित्रपट महोत्सवाप्रमाणे या महोत्सवाला अजूनही ग्लॅमर व प्रतिष्ठा का प्राप्त झाली नाही यापासून जगभरातील चित्रपट ऑनलाईन पाहता येत आहेत तर मग पुन्हा असा वेगळा महोत्सव कशाला अशा प्रश्नापर्यंत अनेक गोष्टी आहेत.

चित्रपटांचे महोत्सव म्हणजे जगभरातील चित्रपटांमधील विविध विषय अथवा थीम, त्याची हाताळणी, दिग्दर्शकाची शैली, दृष्टिकोन व तंत्र यात डोकावण्याची खिडकी वा संधी या व्याख्येत वस्तुस्थिती असली त्या गांभीर्याने खुद्द चित्रपटसृष्टी किती प्रमाणात पाहते असाही एक दीर्घकालीन प्रश्न आहे. असे महत्त्वाचे महोत्सव म्हणजे फक्त चित्रपटसृष्टीतील बुद्धिवादी वर्ग, कलात्मक चित्रपटाचे समर्थक व चित्रपटाचे अभ्यासक व विद्यार्थी यांचाच जणू महामेळा असेही मानले जाते. याचे कारण महोत्सवाच्या उद्घाटनला आवर्जून हजर असणारे ‘स्टार’ त्यानंतर या महोत्सवात कधीच दिसत नाहीत ही अनेक वर्षांपासूनची वस्तुस्थिती आहे. अथवा एखाद्या ‘स्टार’चा वेगळ्या प्रवाहातील चित्रपट ‘पॅनोरमा विभागात’ असल्यास तेवढ्यापुरता तो येतो देखील. पण या महोत्सवातील चित्रपटांनाच आपला एक ‘क्लास’ असतो तर मग पुन्हा हे एखाद्या ‘स्टार’चे वलय ते कशाला असाही एक प्रश्न असतोच. खरंतर हे सर्व प्रश्न नवीन नाहीत. पण त्याची ठोस वा ठाम उत्तरे न मिळताच या महोत्सवाचा प्रवास सुरु आहे. हा महोत्सव केंद्र सरकारकडून आयोजित करण्यापेक्षा ते चित्रपटसृष्टीकडून झाल्यास ते अधिकच नेटके होईल व चित्रपटसृष्टीतील विविध घटकांचा सहभाग त्यात वाढेल असाही विचार अधूनमधून होतो. पण ते अधिकच अवघड काम आहे. कारण या महोत्सवासाठी जगभरातील चित्रपट मिळवण्याची प्रक्रिया जवळपास वर्षभर चालते व त्यासाठी केंद्र सरकारची यंत्रणा कार्यान्वित आहे. आपल्या चित्रपटसृष्टीकडून याचे आयोजन करायचे तर सर्वच प्रादेशिक भाषांची चित्रपटसृष्टी व हिंदी चित्रपटसृष्टी यांना एकत्र यायला हवे व त्यात योग्य तो समन्वय हवा.
चित्रपट महोत्सव हा तसा खूपच मोठा प्रवास व विषय आहे. पण याच दशकात चित्रपटाचे मूल्यमापन त्याच्या गुणवत्तेवर होण्याऐवजी त्याच्या ‘गल्ला पेटी’वरील प्रगती पुस्तकावरून होऊ लागल्याने चित्रपट महोत्सवाचे महत्त्व दुय्यम होत गेले असे एका बाजूला दिसते तर दुसरीकडे असे दिसते की वर्षभर कुठे ना कुठे असे महोत्सव सुरुच असल्याने इकडे नव्हे तर तिकडे काही चित्रपट सहभागी होतात. या उतरंडीमुळे प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सवांचे मूल्य काहीसे कमी झाल्यासारखे वाटते.
सर्वच स्तरातील चित्रपट महोत्सव अगदी थोडक्यात विचारात घ्यायचे तर हे असे,

१ ऑस्कर….
२ कान्स, बर्लिन, व्हेनिस
३ भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पणजी)
४ मामी, थर्ड आय, एशियन
५ दिल्ली, पुणे ,कोलकाता, चेन्नई, कोल्हापूर शहरातील देश विदेशांतील चित्रपटांना स्थान देणारे महोत्सव
६ राज्य चित्रपट पुरस्कार व महोत्सव
… आता यानंतर याच महोत्सवाचा रंग बदलत जातो. तो चुकीचा आहे असेही म्हणता येणार नाही.
७ आयफा – हिंदी चित्रपटसृष्टीच्या झगमगाट व चकचकाट यांना उजळवून टाकणारा व खास करून विदेशात साजरा होणारा महोत्सव. तेथील स्थानिक भारतीयांना हिंदी चित्रपटाची संस्कृती चांगलीच माहिती असली तरी स्थानिक चित्रपट रसिकांचे हिंदी चित्रपटाबाबत काय बरे मत होईल?
८ मिक्ता अथवा आता माई – हा आयफासारखाच पण मराठीचा विदेशात दणक्यात साजरा होणारा ‘इव्हेंट’
९ प्रसारमाध्यमांकडून आयोजित होणारे चित्रपट महोत्सव.
१० आता तर अगदीच छोट्या शहरातही महोत्सव आयोजित करण्याचे फॅड वाढलय. त्यातही चित्रपट सहभागी केले जातात व नामवंत कलाकार हौसेने पुरस्कार स्वीकारून ती छायाचित्रे सोशल साइट्सवर टाकतात.

या सगळ्यांना एकाच रांगेत बसवणे पूर्णपणे चुकीचे आहे. अथवा यातील महत्त्वाच्या महोत्सवाना उगाच कमी लेखल्यासारखे होईल. पण या प्रत्येक महोत्सवाची आपली स्वतःची ओळख आहे हे नाकारता येत नाही. ऑस्कर हा पूर्णपणे वेगळाच विषय आहे. आपल्या शासनाकडून त्यासाठी चित्रपट पाठवला जातोय. ‘लगान’ने (२००१) त्याच्या विदेशी चित्रपटाच्या विभागात अंतिम फेरीत नामांकन मिळवले व त्यानंतर आशुतोष गोवारीकरने अमेरिकेत जाऊन त्या स्पर्धेची प्रक्रिया जाणून घेतली म्हणून आपलेही ऑस्करबाबतचे ज्ञान वाढीला लागले. चित्रपट महोत्सवाचे असे काही वैशिष्ट्य असतेच. ‘श्वास’ची (२००३) ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून निवड होताच मराठी सामाजिक सांस्कृतिक साहित्य क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यापासून मराठी चित्रपट गुणवत्तेत सरस आहेत असे वातावरण निर्माण झाले व वातावरणातील सकारात्मक उर्जेने निर्मितीची संख्याही वाढली. काही मराठी चित्रपट विविध देशातील महोत्सवात दाखल होऊ लागले. कान्स महोत्सवात ‘हलाल’ तर माद्रिद महोत्सवात ‘लपाछपी’ दाखवले गेल्याने निर्माता दिग्दर्शक व कलाकार यांचा आत्मविश्वास वाढीला लागला. ‘लेथ जोशी’ हा चित्रपट देखील विविध महोत्सवात दाखल झाला. आपल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पॅनोरमात यावर्षी नटसम्राट, सैराट, रिंगण, एक अलबेला या चार मराठी चित्रपटांची निवड झाली. महोत्सवात हजर असणार्‍या अन्य भाषिक प्रसार माध्यमे व चित्रपट अभ्यासक यांना या चित्रपटातून मराठी चित्रपटाच्या विविधतेची कल्पना येईल. महोत्सवाची हीच खासियत आहे की देशविदेशातील विविध भाषिक चित्रपटात सध्या काय बरे सुरु आहे हे जाणून घेणे. अशा मोठ्या महोत्सवात स्थान न मिळणारे चित्रपट व त्याचे निर्माते दिग्दर्शक कलाकार यांनाही पुरस्कार हवे असतात. काहींची ती मानसिक गरज असते तर काहीना चमकोगिरीसाठी काही तरी हवेच असते. सर्वच प्रकारच्या महोत्सवांना स्पेस अथवा स्थान आहे हेच या दशकात आकाराला आलेले मोठेच सत्य आहे. हे कितीही ‘वास्तव’ असले तरी काही नवीन प्रश्नही निर्माण झाले. मराठीतील ग्लॅमरस पुरस्कारांच्या विदेशातील सोहळ्याची सवय झाल्याने अनेकांना राज्य चित्रपट पुरस्काराचे काहीच कौतुक राहिलेले नाही. भविष्यात असेच काही आपल्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबाबत होणार नाही ना? दुबईपासून सिंगापूरपर्यंत महोत्सवाचे आयोजन वाढलंय. त्यात आपल्या हिंदी मराठी चित्रपटाला संधी मिळते तर पणजीच्या महोत्सवाकडे लक्ष का द्या असा व्यावहारिक विचार होऊ शकतो. चित्रपट महोत्सव म्हणजे चित्रपट कसा पहावा ऐकावा सांगावा हे अनुभवण्याची उत्तम संधी. आपण या माध्यम व व्यवसाय याचाच भाग असलो तरी हे महोत्सव आपण अजून विद्यार्थी आहोत याची जाणीव देतात यासाठीच तर त्याला हजर राहायचे असते. पण काही महोत्सवांचे फेस्टिव्हल झाले व छानछोकीपणे मिरवायचे इव्हेंट महत्त्वाचे झाल्याने चित्रपटाकडे गांभीर्यपूर्वक पाहणार्‍यांची संख्याही वाढली नाही. चित्रपट म्हणजेच जुन्या आठवणी, फिल्मी गप्पा टप्पा, कलाकारांच्या गोड गोल मुलाखती, गॉसिप्स, चित्रपटाचे प्रमोशन व गल्ला पेटीवरचे मोठ्ठाले आकडे याभोवतीच बरेच काही फिरत वा खेळत असल्यानेही महोत्सवाचे गांभीर्य दुय्यम झालेय. अन्यथा इफीत ८८ देशांचे १९४ चित्रपट ही मेजवानी अफाटच म्हणायची ना? त्यात पंचवीसपेक्षा जास्त चित्रपट ऑस्कर विजेते आहेत ही तर मोठीच पर्वणी. चित्रपटसृष्टीत एकाच वेळेस अनेक मार्गावरून प्रवास करते तेव्हा त्यात काही गोष्टींची सरमिसळ होणार तर काही मागे पुढे पडणारच. हीच वस्तुस्थिती असली तरी महोत्सवाना उधाण न येता त्याची संख्या नियंत्रणात राहण्यातच चित्रपटसृष्टी, प्रसार माध्यमे व चित्रपट अभ्यासक यांचे हित होते.
दिलीप ठाकूर – glam.thakurdilip@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:05 am

Web Title: blog by dilip thakur on film festivals
Next Stories
1 सेलिब्रिटी क्रश: ‘क्रश’.. ते काय असतं भाऊ?
2 Bigg Boss 10: स्वामी ओमजींना अटक करण्यासाठी पोलीस बिग बॉसच्या घरात दाखल
3 सलमानची भूमिका वठवू शकेल का वरुण धवन?
Just Now!
X