X

बिग बी @75 : अबब! सर्वच बाबतीत ‘ऊंची’

आपल्या माध्यम व व्यवसायातील अन्य गोष्टीतही विस्तारत त्याने स्वतःलाच वयाची जाणीव होऊ दिली नाही

पुत्र/ भाऊ/ पती/ पिता/ सासरा/ आजोबा तसेच माणूस/ अभिनेता/ मॉडेल/ निर्माता/ वितरक/ सूत्रसंचालक/ ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर/ उद्योजक/ समाजकारणी/ राजकारण्यांचा मित्र अशा अनेक भूमिका/ जबाबदाऱ्या मोजण्याचे कोणतेही परिमाण नाही हे ‘अमिताभ बच्चन’ यांचे यश आहेच. पण त्याचसोबत पंचाहत्तरीपर्यंत कार्यरत राहण्यातील रहस्यदेखील आहे. शारीरिक ऊंचीपेक्षाही ही ऊंची केवढी तरी विशाल/ भव्यदिव्य आहे. अशी माणसे जगात फारच थोडी असतात. ‘स्टार’ म्हणून बिग बींचा के. ए. अब्बास दिग्दर्शित ‘सात हिन्दुस्तानी’ (१९६९) या पहिल्या चित्रपटापासूनचा प्रवास विविध स्तरावरचा आहे. त्याचा शोध आठही दिशांनी घ्यावा तरी तो कमीच आहे. त्यांचे काही चित्रपट सुपरहिट ठरलेत, काही फ्लॉप ठरले, काही रखडले (यार मेरी जिंदगी हा त्यांचा चित्रपट तब्बल २१ वर्षांनी पूर्ण होऊन एकदाचा प्रदर्शित झाला), तसेच मुहूर्ताला बंद पडले (रुद्र, शिनाख्त, बंधुआ, टायगर, रिश्ता, सरफरोश असे आणखीन काही), काही चित्रपट दोन रिळांच्या चित्रीकरणानंतर डब्यात गेले (सुभाष घईंचा ‘देवा’) अशा संदर्भापलीकडे जाऊनही हा कलाकार खूप मोठा आहेच. त्यांच्या ‘एबीसीएल’ या चित्रपट निर्मिती कंपनीने लवकरच गाशा गुंडाळला हे सर्वज्ञात आहे. पण ते दिल्ली वितरण विभागात चित्रपट वितरित करायचे (उदा. गिरफ्तार) हे फारसे कुठे चर्चेत आले नाही. सरस्वती ऑडियोचेही ते मालक. आपल्या माध्यम व व्यवसायातील अन्य गोष्टीतही विस्तारत त्यांनी स्वतःलाच वयाची जाणीव होऊ दिली नाही असेच दिसतेय. जाहिरातपटात दिसताना देखिल त्यांनी सामाजिक भान जपलंय. पोलिओ डोस संदर्भातील त्यांची जाहिरात खेड्यापाड्यात खोलवर पोहोचली आणि समाजजागृती वाढली. अमिताभ बच्चन म्हणजे फक्त पैसे कमवायचे मशीन नाही तर त्यांचा सभोवार असा प्रवास आहे. त्यातून मिळणारा मानसिक/ भावनिक आनंद त्यांच्या वाढत्या वयाची आठवण करुन देत नाही.

याच प्रवासात बिग बी माणूस म्हणून कधी बदलले? याबाबत प्रत्येकाची मते भिन्न असतील.

वाचा : Inside Photos समंथा-नागा चैतन्यच्या लग्नाची गोव्यात धामधूम

बंगलोर येथील मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘कुली’च्या सेटवर २६ जुलै १९८२ रोजी पुनीत इस्सारचा मारहाण दृश्यात ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात अमिताभ यांच्या पोटात टेबलाचा लागलेला कोपरा जीवघेणा ठरला. लगोलग तेथून त्यांना मुंबईत आणून ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांच्या तब्येतीला आराम पडावा, ते बरे व्हावे म्हणून देशभरातीलच नाही तर विदेशातील चाहत्यांनाही प्रार्थना केल्या. हे सगळेच अदभूत होते. बरं वाटल्यावर अमिताभ यांनी जुहूच्या आपल्या प्रतिक्षा बंगल्याच्या खिडकीतून दररोज सायंकाळी काही वेळ चाहत्यांना दर्शन देणे सुरु केले. स्टार अमिताभ यांच्यामधील हळवा माणूस यावेळेस दिसला.

सत्तरच्याच दशकात त्यांच्या व रेखा यांच्याच्या मैत्रीच्या नात्यावर काही गॉसिप मासिकांनी बरेच सवंग व वायफळ लिहिले म्हणून त्यांनी एकूणच मीडियाशी कट्टी घेतली. त्या दिवसात त्यांच्या नवीन चित्रपटांच्या मुहूर्ताला (अग्निपथ, हम, गंगा जमुना सरस्वती, खुदा गवाह, अकेला) त्यांचे आम्हा सिनेपत्रकारांना प्रत्यक्ष दर्शन होई आणि ते देखील सुखावणारे असे. पण १९८४ साली आपले मित्र राजीव गांधी यांना मदत करण्यासाठी अमिताभ यांनी राजकारणात टाकलेले पाऊल खूपच वादग्रस्त ठरले. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांनी समाजवादी पक्षाचे मुरब्बी उमेदवार हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला. पण तेथे अमिताभ ‘मौनी खासदार’ म्हणून चर्चेत राहिले. तर बोफोर्स प्रकरणात त्यांचे नाव गोवले गेल्याने स्टार अमिताभ यांना राजकीय पत्रकारांनी ‘व्हिलन’ ठरवले. हे सगळंच एकमेकांत गुंतलंय. अमिताभच्या एकूणच आयुष्यातील हा कसोटीचा काळ होता. तेव्हाच्या गढूळ वातावरणात ‘शहेनशहा’च्या (१९८८) पोस्टरवरील अमिताभ यांना काही राजकीय पक्षांकडून विरोध झाला आणि काळेही फासले गेले.

‘शहेनशहा’ विरोधात तापलेले वातावरण पाहता आम्हा समीक्षकांसाठी आयोजलेल्या खेळाच्या वेळेस पोलिसांकडून बॅगा तपासल्या गेल्या. तर, मराठी मंदिर चित्रपटगृहाबाहेर पहिले तीन आठवडे पोलिसांची गाडीही उभी होती. हे सगळेच त्रासदायक क्षण बिग बींच्या वाट्याला आले. त्याच गोंधळात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि वर्षभरात मीडियावरील बंदी उठवली. त्या दिवसात अमिताभ यांच्या मुलाखतीसाठी स्वतंत्र भेट मिळे व ते अतिशय अभ्यासपूर्ण सविस्तर उत्तरे देत. त्यातूनच त्यांची चित्रपट माध्यमांशी असणारी बांधिलकी व सामाजिक सांस्कृतिक गोष्टींबाबतची वैचारिक सखोलता जाणवे.

वाचा : सगळ्यांपासून दूर जाणार तैमुर, सैफने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

‘खुदा गवाह’ (१९९२) नंतर त्यांनी काही काळ चित्रपटापासून दूर राहणे पसंत केले. त्या दिवसात अनेक चित्रपटांचे मुहूर्त आणि ध्वनिफिती प्रकाशन त्यांच्या हस्ते होई. तेव्हा ते बरेच मवाळ झाल्यासारखे वाटे. आणि अशातच त्यांनी दाढी वाढवली व त्यावर ‘अँग्री यंग मॅन’ हा ‘शांतीदूत’ झाला अशी प्रतिक्रिया उमटली. दाढीत ते खूपच गंभीर दिसायचे. पण जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील ‘श्रीमान आशिक’ चित्रपटाच्या ध्वनिफित सोहळ्यास ते सफाचट दाढीत येताच ती चक्क बेक्रिंग न्यूज ठरली.

बिग बी अशा अनेक गोष्टींतून घडत/बदलत गेले. त्यांचा हा प्रवास अनेक वळणावळणांनी भरलेला आहे. एक संवेदनशील माणूस म्हणून ते सार्‍यातून गेले आहेत. अगदी सुरुवातीला त्यांचे चित्रपट फ्लॉप होत असताना निर्माता-दिग्दर्शक कुंदनकुमार यांनी चार रिळांच्या चित्रीकरणानंतर ‘दुनिया का मेला’ मधून त्यांना काढून संजय खानला घेतले. गंमत म्हणजे या चित्रपटात रेखा नायिका होत्या. पडत्या काळात असे एखाद्या चित्रपटातून काढले जाणे, हे पचवणे सोपे नसते. व्यक्ती म्हणून बिग बींनी हे कसे सहन केले असेल? हा एक अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे. तर अमिताभ त्यांच्या दमदार आवाजानेही उत्तम अभिनय करतात हे सत्यजित रे दिग्दर्शित ‘शतरंज के खिलाडी’, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ अशा चित्रपटांच्या सुरुवातीच्या निवेदनातून स्पष्ट झाले.

बिग बी हा तसा न संपणारा विषय. संसारिक/ कौटुंबिक जीवनातील त्यांचे रुप हा वेगळाच विषय. अभिषेकच्या कारकिर्दीबाबत त्यांनाही चिंता असणारच. एक जागरूक पिता म्हणून त्यांच्या याबाबत काही भावना असणे स्वाभाविक आहेच. आणि अशा खासगी सुखदु:खाचा आपल्या इमेज, विश्वासार्हता व तब्येतीवर परिणाम होऊ न देण्याचा कळत नकळत प्रयत्नही असतोच.

बिग बी म्हणजे बरेच काही आहे. हा फक्त एक ट्रेलर आहे. अमिताभ बच्चन अभिनयाचे विद्यापीठ आहेतच. पण चौकस/ चिकित्सक व्यक्ती म्हणूनही ते खूप काही आहेत. जया भादुरीची यांची त्यांना मिळालेली साथ या सार्‍यात आहेच म्हणा. काही संकटे आणि अडचणींच्या वेळी ते पहिली चर्चा आपल्या पत्नीशीच करतात.

आजही अमिताभ बच्चन या शक्तीची वैशिष्ट्यपूर्ण वाटचाल सुरु असून, वय वर्ष ७५ हा त्यांच्या चौफेर/ अष्टपैलू/ विविधस्पर्शी वाटचालीतील एक टप्पा आहे इतकेच. या टप्प्यावर मागे वळून पाहिलेच पाहिजे असे त्यांना जराही वाटणार नाही हेच तर त्यांच्या तारुण्याचे मोठेच वैशिष्ट्य. आपण त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देऊयात….

-दिलीप ठाकूर

 

First Published on: October 6, 2017 4:30 pm
Outbrain