दिलीप ठाकूर

चित्रपट संस्कृतीमधील एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे, त्याचे महोत्सव! पणजी (गोवा) येथील भारताच्या पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन होत असताना या महामेळ्यावर फोकस टाकताना पटकन लक्षात येईल की ही तर देशविदेशातील जुन्या आणि नवीन अशा दोन्ही काळातील अनेक भाषिक चित्रपटांची जणू महाजत्राच आहे. २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत चित्रपट, त्याची अनेक विषयांवरची चर्चासत्रे, अनेक प्रकारच्या भेटीगाठी, गप्पा आणि फिल्म मार्केट यांची प्रचंड रेलचेल आहे. तसे आपल्या देशात तर झालेच पण जवळपास जगभरात विविध प्रकारचे लहान मोठे चित्रपट महोत्सव सातत्याने होतच असतात. आजच्या ग्लोबल युगात तर अनेक चित्रपट अशा अनेक महोत्सवात दाखल होत असून काही पुरस्कार प्राप्त करीत असतात. पण अनेक देशांचा एक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असतो अथवा आहे. त्याची प्रतिष्ठा आणि ओळख स्वतंत्र आणि वेगळी आहे. पणजी येथे होत असलेला चित्रपट महोत्सव हा आपल्या शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. पूर्वी तो दर वर्षाआड नवी दिल्ली येथे तर त्याच्या मधल्या वर्षी देशातील चित्रपट निर्मितीच्या एका शहरात आयोजित करण्यात येत असे. मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद, चेन्नई ( पूर्वीचे मद्रास), बंगलोर आणि त्रिवेंद्रम येथे त्याचे आयोजन केले जाई. मुंबईत १९८४ आणि १९९५ साली तो योग आला होता. आणि मेट्रो चित्रपटगृह हे त्याचे मुख्य केंद्र होते. त्याशिवाय इतरही काही थिएटरमध्ये त्याचे आयोजन केले जाई. एकाच वेळेस अनेक स्क्रीनवर हा महोत्सव सुरु असतो. याचे कारण म्हणजे या महोत्सवातील विविधता हेच आहे. मुख्य विभागासह अनेक प्रकार या महोत्सवात असतात. पॅनोरमा विभागात देशातील विविध भाषिक सत्तावीस चित्रपट, सिंहावलोकन विभागात देशातील आणि विदेशातील प्रत्येकी एका सिनेमावाल्याचे चित्रपट, एकाद्या विशिष्ट प्रकारचे चित्रपट असे करता करता व्यावसायिक चित्रपटांचाही भाग यात आहे. आणिही छोटे छोटे विभाग असतातच. पूर्वी हा महोत्सव प्रत्येक वर्षी १० ते २४ जानेवारी असा पंधरा दिवस असे. काही वर्षांपूर्वी त्यात बदल करण्यात आला. विविध देशांतील चित्रपट महोत्सव एकाद्या विशिष्ट शहराच्या नावाने ओळखले जातात तसाच आपलाही असावा असा विचार पुढे आला. बर्लिन, व्हेनिस, कान्स, माॅस्को याप्रमाणे आपला पणजी चित्रपट महोत्सव ठरला आणि त्याचा अवधी पंधराऐवजी नऊ दिवस असा करण्यात आला. आता गोवा हा पिकनिक स्पाॅट आहे, त्यामुळे चित्रपटाच्या जोडीला भटकंती असाही हेतू साध्य होऊ शकतो.

यावर्षी पन्नासावा चित्रपट महोत्सव असल्याने अगदी जणू जंगी आयोजन आहे.काय पाहू आणि काय बरे राहून जाईल हे काहीच सांगता येणार नाही अशी देशविदेशातील चित्रपटांची महाजत्राच आहे. भारतासह जगातील दोनशे चित्रपट यात सहभागी आहेत. नऊ दिवसात रोजच प्रत्येकी चार अथवा पाच चित्रपट पाहिले तरी जास्तीत जास्त चाळीस चित्रपट पाहून होईल. अनेकदा तरी विदेशी चित्रपटाची माहिती पुस्तिका वाचूनच कोणता चित्रपट पाहायचा याचा निर्णय घ्यावा लागतो. जागतिक चित्रपटाचा अभ्यास असेल तर ही निर्णयक्षमता काहीशी सोपी होते. ते पाहायचे तर पॅनोरमा विभागात कधी जायचे? यावर्षी यात पाच मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे ( गतवर्षी फक्त दोन मराठी चित्रपट होते, पण त्याबाबत कसलीही प्रतिक्रिया उमटली नाही हे आश्चर्यकारक आहे), यावेळी समीर विद्वांस दिग्दर्शित आनंदी गोपाळ, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित भोंगा, आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित फोटो प्रेम, अनंत महादेवन दिग्दर्शित माय घाट क्राईम नंबर १०३\२००५, तुझ्या आयला, या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी फक्त ‘आनंदी गोपाळ ‘ प्रदर्शित झाला आहे. पॅनोरमा विभागात बंगाली आणि मल्याळम भाषेतील प्रत्येकी तीन चित्रपट आहेत. पॅनोरमा विभागातील चित्रपटाची निवड सेन्सॉर संमत तारखेनुसार होते. १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट या कालावधीत चित्रपट सेन्सॉर संमत असणे गरजेचे असते. पण अजूनही कित्येक सिनेमावाल्यांना अशा अनेक चित्रपट महोत्सवात चित्रपट दाखल करण्याचे नियम माहित नसतात किंवा ते शाॅर्ट कट शोधण्याचा प्रयत्न करतात. तर नाॅन फिचर फिल्ममध्ये स्मिता तांबेची भूमिका असलेला ‘गढूळ ‘ या चित्रपटाचा समावेश आहे. आपला चित्रपट या महोत्सवात दाखल झाल्याचा स्मिता तांबेला विशेष आनंद झाला आहे. चित्रपट महोत्सवाचे हे देखील एक देणे आहे.

यावर्षीच्या चित्रपट महोत्सवात पहिल्याच दिवशी रजनीकांत आणि दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त अमिताभ बच्चनचा विशेष सत्कार आहे. अमिताभ बच्चनचा पहिला चित्रपट ‘सात हिन्दुस्तानी ‘ ( रिलीज ७ नोव्हेंबर १९६९) ला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याचे सत्तरच्या दशकातील काही सुपर हिट चित्रपट या महोत्सवात दाखल झाले आहेत. त्यात यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार ‘ खास उल्लेखनीय आहे. जगभरातील पन्नास महिला दिग्दर्शकींचे पन्नास चित्रपटही यात पाहता येतील. तर यावेळी प्रीमियर शोची प्रचंड चंगळ आहे. एकूण नव्वद भारतीय चित्रपट, सहा जागतिक चित्रपट तर अकरा आशियाई चित्रपटांचे प्रीमियर यात होतील. विशेष विभागात ‘केस्तांव ‘ या कोंकणी चित्रपटाचा समावेश आहे. तर ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत सहभागी झालेल्या चोवीस चित्रपटांचाही यावेळी समावेश आहे. तर यावर्षी निधन झालेल्या तेरा सिनेमावाल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल व त्यांचे काही चित्रपट दाखवले जातील. त्यात मृणाल सेन, खय्याम, गिरीश कर्नाड, राजकुमार बडजात्या, वीरु देवगन, विद्या सिन्हा, कादर खान या हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा समावेश आहे. तसेच तीन मूकपटही आहेत. तर ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘सत्यकाम ‘ आणि शक्ती सामंता दिग्दर्शित ‘आराधना ‘ या हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचीही निवड झाली आहे. एव्हाना तुम्ही अबब म्हणत असावेत. आणखीन काही चित्रपटांचा समावेश आहे. अगदी ‘गल्ली बाॅय ‘ही आहे. महोत्सवाच्या मुख्य केंद्रासह यावेळी पणजीतील जाॅगर्स पार्क आणि मिरामार बीच येथे खुल्या पटांगणातही शोचे आयोजन करण्यात आले आहे. पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने एक टपाल तिकिट प्रकाशित करण्यात आले आहे. याशिवाय पस्तीस मास्टर क्लास, संवाद व चर्चासत्र यांचेही आयोजन आहेच. त्यातून चित्रपट निर्मितीतील बारकावे ज्ञात व्हावेत असा हेतू आहे. तर फिल्म मार्केटमध्ये जगभरातील अनेक चित्रपट, नवीन तंत्र याचीही भरपूर माहिती मिळते. खुद्द महोत्सवाचे पुस्तक आणि असंख्य बुकलेट यातूनही भरभरून माहितीचा स्रोत आणि शोध कायम राहतोच आणि या सगळ्याच्या जोडीला अनेक फिल्मवाल्यांच्या होत असलेल्या भेटीगाठी असतातच. कशाचीच कमतरता अशी नाहीच. असा चित्रपट महोत्सव म्हणजे एक प्रकारची जगभरातील चित्रपट संस्कृतीकडे डोकावण्याची जणू खिडकीच! चित्रपट माध्यम व व्यवसाय या दोन्हीला सिरियसली घ्यायला हवे हे यातून अधोरेखित होतेय. चित्रपट म्हणजे फक्त ग्लॅमर, गाॅसिप्स, गल्ला पेटी आणि फिल्मी गप्पा इतकेच नव्हे तर बरेच काही असते याची जाणीव आणि ओळख देण्यासाठी हे चित्रपट महोत्सव असतात. एक प्रकारची ही सांस्कृतिक चळवळ आहे, तर एक प्रकारची ही महाजत्राच आहे. अनेक फिल्मवाले, तसेच चित्रपट समिक्षक/विश्लेषक/अभ्यासक आवर्जून हजर राहतात. भेटीगाठी होतात. जुन्या नव्या चित्रपटांची महती आणि माहिती समजते. एक प्रवाह सुरु राहतो. यावर्षी पन्नासावा चित्रपट महोत्सव असल्याने तर कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपट ते रंगीत असा प्रवास असतानाच अतिशय झगमगाटात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.