X

BLOG : बाई भानावर या!

कास्टिंग काऊचचा मुद्दा उपस्थित करत बाईंनी स्वत:च एका अागळ्या वेगळ्या प्रकारे गाजावाजा केला आणि प्रकाशझोतात आल्या.

सुशांत जाधव

बाईचे चित्रपट मोजके तेही तेलगू भाषेत असल्यामुळे ती आपल्याला फारशी परिचित असण्याचा फारसा संबंध नाही. पण कास्टिंग काऊचचा मुद्दा उपस्थित करत बाईंनी स्वत:च एका अगळ्या वेगळ्या प्रकारे गाजावाजा केला आणि प्रकाशझोतात आल्या. चित्रपट सृष्टीत कास्टिंग काऊच हा मुद्दा तिच्यामुळे समोर आलाय असं नाही. चंदेरी दुनियेच्या पडद्यामागची शापित बाजू अनेकदा चर्चेत येत असते. पण तिने टॉपलेस होऊन अनोखे आंदोलन छेडल्यामुळे या मुद्दापेक्षा तिच्या कृतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बाईनं तो स्टंट केला होता असा आरोप मला मुळीच करायचा नाही. पण तिने आज केलेल्या आरोपावर तिला भानावर आणावस नक्की वाटत.

क्रिकेटच्या मैदानातील देवावर या श्रीची छाया का पडावी? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मैदानात ज्या माणसाने खेळातच नव्हे तर खेळाडूवृत्ती कशी असावी याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले, त्याच्यावर आरोप करुन हिला काय मिळणार? एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्यावर निशाणा साधण्याचा प्रकार करुन ती प्रकाश झोतात येण्याचा प्रयत्न करतेय का? सचिन आणि चार्मी कौर अर्थात सुरदीप कौर यांच्यात रोमान्स झाल्याचा अर्थ श्री रेड्डीने फेसबुकवरुन शेअर केलेल्या पोस्टवरुन लावण्यात येत आहे. प्रसिद्धीसाठीच ती असे विपरित कांड करत असल्याचे बाऊन्सर तिच्यावर पडण्यास सुरुवातही झाली आहे. तिला असे समालोचन करुन याशिवाय दुसरे काय मिळणार म्हणा.

क्रिकेटर आणि अभिनेत्री यांची नावे जोडणे ही गोष्ट आपल्याकडे नवी नाही. नव्वदीच्या दशकात भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हा रोमान्सचा बादशहा म्हणून मिरवायचा. रवी शास्त्री आणि अमृता सिंग हे प्रकरणही चांगलेच गाजले. अजय जडेजा, युवराज सिंग, विराट कोहली, हार्दिक पांड्या ही मंडळीही प्रेमाच्या मोहजाळ्याला स्पर्शून आलेली मंडळी म्हणता येतील. पण मास्टर ब्लास्टरचे नाव आतापर्यंत अशा प्रकरणात कधीच आले नाही. त्यामुळेच श्री रेड्डीच्या बरळण्यावरुन देव भ्रष्ट होणार नाही तेही तितकेच खरे आहे.

तेंडुलकरच्या बाबतीत अनेक किस्से क्रिकेट चाहत्यांना माहित आहेत. त्यातीलच एक ऐकीवातील किस्सा. लॉर्डसच्या मैदानावर इंग्रजांना नमवून शर्ट काढायचा प्लॅन सौरव दादाने आखला होता. यावेळी सचिन तेंडुलकरने रुमालही काढणार नाही, अशीच काहीशी भूमिका घेतली होती. त्यामुळे गांगुलीने वनमॅन आर्मीची भूमिका बजावत बेत तडीस नेला. सांगण्याच तात्पर्य आमच्या क्रिकेटच्या देवात संयम, लाजाळूपणा आणि आदर याचा भांडार आहे. त्याला बदनाम करुन कुणीही आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला तर त्याला फारसा फरक पडणार नाही. पण असे करणाऱ्याला मात्र चटका निश्चितच बसेल. सरशेवटी एवढच म्हणेन बाई तुमचा अभिनय कच्चा असल्याचे वेगवेगळ्या स्टंटबाज चर्चेतून सहज दिसून येतय. बाई आता भानावर या नाही तर बाद ठराल!

First Published on: September 12, 2018 6:16 pm