महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. अमिताभ आणि अभिषेक यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर नानावटी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान मुंबईतील जुहू भागातील बच्चन कुटुंबाचे चारही बंगले मुंबई महापालिकेने सील केले आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

मुंबई महापालिकेनं महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’ कन्टेन्मेंट झोन म्हणून रविवारी जाहीर केला. तसा अधिकृत बॅनरच पालिका कर्मचाऱ्यांनी या बंगल्याबाहेर लावला आहे. त्यामुळे या भागात आता कोणालाही प्रवेश करता येणार नाही. अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सगळ्यांची आता कोविड चाचणी होणार आहे.

मुंबई महापालिकेने बच्चन यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. बच्चन कुटुंबाच्या वेगवेगळया बंगल्यांमध्ये मिळून एकूण ५४ जण काम करतात. यातील २८ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. सोमवारी त्यांचा अहवाल येणे अपेक्षित आहे.

अमिताभ यांनी स्वत: दिली माहिती
अमिताभ बच्चन यांनी काल रात्री स्वत: टि्वट करुन करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे.” या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.