बॉलिवूडमध्ये ९०च्या दशकात ‘गुप्त’, ‘दिल्लगी’, ‘सोल्जर’, ‘हमराज’ यांसारख्या अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजेच बॉबी देओल. गेल्या काही वर्षांपासून बॉबी रुपेरी पडद्यापासून दूर होता. मात्र, आता त्याची गाडी पुन्हा हळूहळू रुळावर येत आहे. बराच काळ चित्रपटांमध्ये काम न मिळणाऱ्या बॉबीच्या नशिबाचे दार उघडले आहे. गेल्याच वर्षी त्याचा ‘पोस्टर बॉइज’ चित्रपट प्रदर्शित झाला.

वाचा : राणा डग्गुबतीच्या ‘हाथी मेरे साथी’चा फर्स्ट लूक

‘पोस्टर बॉइज’मध्ये बॉबीसोबत सनी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई केली नसली तरी बॉबीचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन झाले हे खरं. यानंतर त्याला एक बिग बजेट चित्रपटही मिळाला. बॉलिवूडचा ‘भाईजान’ असलेल्या सलमान खानने त्याला आगामी ‘रेस ३’ चित्रपटात घेतले. आता इतका मोठा चित्रपट मिळाल्यानंतर बॉबीच्या करिअरला चालना मिळणार यात शंका नाही.

वाचा : तब्बल २५ वर्षांनंतर या भूमिकेत दिसणार ‘सीता’

येत्या काळात बॉबी दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसेल. ‘रेस ३’ व्यतिरीक्त तो ‘यमला पगला दीवाना ३’ मध्ये दिसू शकतो. यात तो पुन्हा एकदा वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनीसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसेल. ‘यमला पगला दीवाना’च्या सीरिजमधील पहिल्या दोन चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळाले होते. ‘यमला पगला दीवाना’ने तेव्हा बक्कळ कमाई केली होती. तर ‘रेस’ सीरिजमधील आधीच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे बॉबीचे आगामी दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरतील अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांसाठी बॉबीला तगडे मानधन मिळाल्याचे म्हटले जातेय.