अभिनेता बॉबी देओलला अभिनयाचा आणि दमदार अंदाजाचा वारसा त्याच्या कुटुंबातूनच मिळाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ९० च्या दशकात बॉबी देओलच्या काही चित्रपटांनी प्रेक्षकांची दाद मिळवली होती. पण, सनी देओलच्या तुलनेत त्याच्या चित्रपटांना हवी तशी दाद मिळाली नाही. कुरळ्या केसांच्या बॉबी देओलची फिमेल फॅन फोलोइंगही चांगलीच होती. पण, मग नेमकं बॉबीच्या वाट्याला अपयश आलं का? याबाबतच्या विविध चर्चाही बॉलिवूड वर्तुळामध्ये रंगत होत्या. एका काळानंतर त्याला चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाले आणि तो चित्रपट नगरीतून कुठे गायबच झाला. त्याने ब-याचदा चित्रपटांमध्ये पुन्हा येण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्यात यश मिळाले नाही. बॉबीने हफिंगटन पोस्ट या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्याला चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते तेव्हाचा अनुभवही त्याने यावेळी सांगितला. चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाल्याने बॉबीने मद्यपान करण्यास सुरुवात केली होती. मात्र, यातून त्याच्या पत्नीने त्याला वाचवल्याचे त्याने सांगितले.

बॉबीने मुलाखतीत सांगितले की, चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाल्यावर तो मद्यपान करु लागला होता. तो म्हणाला की, या जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणजेच माझी बायको तानिया हिने मला मदत केली. तिने मला काही प्रश्न तेव्हा केले होते. तुम्ही हे काय करत आहात? याने तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? तुम्ही अशाप्रकारे स्वतःचे नुकसान का करून घेताय? तेव्हा मी खूप दिवसांनंतर स्वतःला पाहात होतो. मी स्वतःलाच तेव्हा विचारले, माझं काय झालं आहे? निर्माते किंवा दिग्दर्शक माझा पाठलाग करत आहेत का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे होते. तेव्हा मला जाग आली. त्यानंतर मी हे सर्व काही सोडण्याचा निर्णय घेतला. काम न मिळाल्याने अस्वस्थ वाटू लागते आणि आपण दुःखी होतो.

याव्यतिरीक्त बॉबीने त्याच्या आणि इम्तियाज अलीच्या संबंधाबद्दलही सांगितले. इम्तियाज अलीने आपल्याला अनेकदा धोका दिल्याचे बॉबीने मुलाखती दरम्यान सांगितले. पण, अजूनही ते दोघे मित्र असून तो त्याच्याबद्दल काहीही चुकीचा विचार करत नसल्याचेही बॉबी म्हणाला. तो म्हणाला की, ‘जब वी मेट’ चित्रपटात मी काम करणार होतो. आधी या चित्रपटाचे नाव ‘गीत’ असे ठरले होते. इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘सोचा ना था’ हा चित्रपट मी पाहिला होता. तेव्हा मी इम्तियाजकडे गेलो आणि तो कथेची खूप चांगली मांडणी करतो असे त्याला सांगितले. त्याच्यासोबत मी काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यावेळी ‘जब वी मेट’ची स्क्रिप्ट पूर्ण झाली होती. अली तेव्हा निर्मात्यांच्या शोधात होता. श्री अष्टविनायक स्टुडिओला माझ्यासोबत काम करायचे होते. त्यामुळे मी इम्तियाजला साइन करण्याचा सल्ला त्यांना दिला. तसेच, त्याच्याकडे स्क्रिप्टही तेव्हा तयार होती. त्यावेळी करिनाला इम्तियाजला भेटण्याची इच्छा नव्हती. या प्रकरणात मी मध्यस्थी केली. अखेर, करिनाने सहा महिन्यानंतरची तारीख दिली. सहा महिन्यानंतरच ती चित्रपटाच्या कामाला सुरुवात करेल असे तिने सांगितले. काही दिवसांनी श्री अष्टविनायक स्टुडिओने इम्तियाजला साइन केल्याचे मी वाचले. या चित्रपटात करिनाही काम करणार होती. करिनाने तिचा प्रियकर शाहिद कपूरला चित्रपटात काम मिळवून दिले. ‘हायवे’ चित्रपटाच्या वेळीही त्याने माझ्यासोबत असेच केले. आम्ही ‘हायवे’ चित्रपटात एकत्र काम करणार होतो. पण, पुन्हा त्याने तसेच केले. तरीही माझ्या मनात इम्तियाजबद्दल कोणताही राग नाही. तो एक उत्कृष्ट दिग्दर्शक असून चांगले काम करत आहे. आम्ही आजही मित्र आहोत. मी त्याला नेहमी म्हणतो, इम्तियाज तू मला घेऊन चित्रपट बनवशील तेव्हाच मी तुझा चित्रपट बघेन. तो तुझा सर्वात चांगला चित्रपट असेल.