फेब्रुवारी महिना म्हटलं की व्हॅलेंटाइन डेचा उल्लेख ओघाने येतोच. प्रियकर किंवा प्रेयसीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी पक्यासुद्धा सज्ज झाला आहे. आता हा पक्या आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला ना? तर हा पक्या आहे आगामी ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील हिरो.
सलील कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पक्याला प्रेमाची कबुली द्यायची आहे आणि त्यासाठी त्याचा मित्रपरिवार कशी मदत करतो हे या गाण्यात चित्रीत करण्यात आले आहे. या चित्रपटातून शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“बोल बोल पक्या, काहीतरी बोल पक्या…अरे भीड ना, अरे नड कि, काहीतरी बोल पक्या…” असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात त्याच्या आजूबाजूचे सर्वच त्याला त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची गळ घालत आहेत. पक्याला मात्र परीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ हे सांगण्याची हिंमत होत नाही. पक्याची नेमकी स्थिती आणि द्विधा मनस्थिती या गाण्यातून नेमकी उधृत झाली आहे. हे गाणे शिवराज वायचळ, ऋचा इनामदार आणि प्रवीण तराडे यांच्यावर चित्रित झाले असून हे गाणे अवधूत गुप्तेनं गायले आहे.
प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णींचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट असून त्यांच्या या नव्या इनिंगची मराठी चित्रपटसृष्टीत सर्वांनाच उत्सुकता आहे. १२ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे तर नितीन वैद्य हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 12, 2019 3:30 pm