छोटय़ा पडद्यावर वर्षांनुर्वष ‘डेली सोप’ नावाने मालिका चालविण्याचे तंत्र पहिल्यांदा एकता कपूरने गळी उतरवले. त्यानंतर मालिकांचे ‘स्टार कलाकार’ आणि कंपूशाही हा प्रकारही तिच्या मालिकांमधून सुरू झाला. ‘क’च्या बाराखडीतील मालिका यशस्वी करण्याचे कामही तिने केले. एवढेच नाही तर, छोटय़ा पडद्यावर ‘बोल्ड’ दृश्ये आणण्याचे श्रेयही तिच्याच नावावर जमा आहे. मात्र, सिनेमासारखाच आशय-विषयातील ‘बोल्डपणा’ मालिकांमध्ये आणण्याचा अट्टहास अजूनही थांबलेला नाही हेच पुन्हा एकवार ‘ये कहाँ आ गये हम’ या मालिकेच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. एकता कपूरने आपल्या या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्येच चुंबनदृश्य टाकले आहे.
‘बडे अच्छे लगते है’ या एकता कपूरच्या मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यावर चित्रित झालेले प्रणयदृश्य दाखविण्यात आल्यानंतर एकच गहजब उडाला होता. कौटुंबिक मालिकांमध्ये अशा प्रकारच्या दृश्यांची गरजच काय इथपासून ते घरांतील लहान मुलांच्या हातात टीव्हीचा रिमोट कंट्रोल असल्यामुळे निदान मालिकांमधून तरी अशी दृश्ये टाळायला हवीत इथपर्यंत अनेक मतमतांतरे व्यक्त झाली. प्रेक्षकांनी एकता कपूरला या दृश्यांबद्दल पत्रे लिहून राग व्यक्त केला. मात्र प्रसिद्धी मग ती कुठल्याही कारणाने मिळालेली असली तरी ती चांगलीच असते हेच तत्त्व मनाशी पक्के बांधून चालणाऱ्या एकता कपूरने या सगळ्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. मालिकांमध्ये आलेला हा ‘बोल्डपणा’ केवळ तिच्या मालिकेपुरता थांबला नाही. तर अन्य अनेक मालिकांमधून ‘बोल्ड’ दृश्ये दाखविण्याचा प्रकार सुरू झाला. आता थेट मालिकेच्या प्रोमोतूनच चुंबनदृश्य दाखविण्यापर्यंत एकता कपूरचा ‘बोल्डपणा’ वाढला आहे.
सोनी टीव्हीवरील ‘रिपोर्टर’ या मालिकेमधील मुख्य जोडी कृतिका कामरा आणि राजीव खंडेलवाल हे कलावंत असलेल्या प्रोमोमध्ये चुंबनदृश्य टाकण्यात आल्यानंतर समाजमाध्यमांतून त्या गोष्टीची चर्चा झाली होती. मात्र, एकता कपूरच्या ‘ये कहाँ आ गये हम’ या मालिकेच्या प्रोमोतील चुंबनदृश्य अधिक ‘बोल्ड’ दाखवत एक पाऊल आणखी पुढे टाकले आहे. ‘अ‍ॅण्ड टीव्ही’ या वाहिनीवर २६ ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होत असून करण कुंद्रा आणि सान्वी तलवार यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.