बॉलिवूडमधील नायिकांना असते तसे ग्लॅमर मराठीतील नायिकांना नाही, असे म्हटले जायचे. हो म्हटले जायचे. कारण एका ‘बिनधास्त’ नायिकेच्या रूपाने मराठी चित्रपट आणि चित्रपटांतील नायिकांनाही ग्लॅमर मिळाले. मराठी नायिका ग्लॅमरस झाली. कधी ती ‘पार्टी’ प्रकरणामुळे, कधी ‘बिकिनी’ परिधान केल्यामुळे तर कधी ‘जो जास्त पैसे देईन त्याचा मी प्रचार करेन’ असे विधान करून प्रसिद्धीच्या झोतात राहते. ती फक्त ‘बिनधास्त’ आणि ‘ग्लॅमरस’ भूमिका करते, असे म्हणावे तर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘सौ. शशी देवधर’या चित्रपटात ती वेगळ्या ‘लूक’ मध्ये आणि भूमिकेत दिसली. ‘पुणे ५२’ मध्येही ती वेगळ्या भूमिकेत होती. या दोन्ही चित्रपटांतील भूमिकांनी प्रेक्षक आणि समीक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. आता ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या आगामी चित्रपटातही ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. ही बिनधास्त आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे ‘सई ताम्हणकर’.
महाविद्यालयात असताना सईने पहिल्यांदा नाटकात काम केले आणि त्यानंतर विविध आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत तिने सहभाग घेतला. यातून ‘आधे अधुरे’ हे हिंदी नाटकही तिने केले. त्यानंतर ई-टीव्ही मराठीवरील ‘या गोजीरवाण्या घरात’ या मालिकेतून तिने छोटय़ा पडद्यावर पदार्पण केले. ‘अग्निशिखा’, ‘साथी रे’, ‘कस्तुरी’ आदी मालिका तर ‘टाइमप्लीज’, ‘दुनियादारी’, ‘बालकपालक’, ‘पुणे ५२’, ‘लालबाग परळ’, ‘रिटा’, ‘पिकनिक’ आदी चित्रपटांमधूनही सई दिसली. ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटात सई ‘बिकिनी सूट’मध्ये दिसली होती. ‘सनई चौघडे’ या चित्रपटातून सईने मोठय़ा पडद्यावर पदार्पण केले होते.  
सईने सुभाष घई यांच्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ या हिंदी चित्रपटात तसेच आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपटातही छोटी भूमिका केली. ‘आधे अधुरे’सारख्या हिंदी नाटकातून सुरुवात केलेली सई मराठी नाटकात मात्र दिसलेली नाही. याविषयी तिला विचारले असता ‘वृत्तान्त’शी बोलताना ती म्हणाली, खरे आहे. आत्तापर्यंत व्यावसायिक मराठी नाटक मी केलेले नाही. खरे सांगू का सध्या चित्रपटात व्यग्र असल्याने नाटकासाठी मी पाहिजे तितका वेळ देऊ शकत नाही. नाटक करायचे म्हटले की तालीम आणि अन्य सगळ्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. पण वेळ मिळाला की मराठी नाटक करायचा नक्की विचार आहे. पाहू या कधी योग येतोय. मराठी चित्रपट आणि त्यातील नायिकेला सईने ‘बिनधास्त’पण आणि ‘ग्लॅमर’ मिळवून दिले. यावर प्रतिक्रिया काय? या प्रश्नावर सईने सांगितले, असे कोणी म्हटले की बरे वाटते. खरे सांगायचे तर कोणतीही गोष्ट मी ठरवून करत नाही. एखादी भूमिका मला भावली तर मी ती स्वीकारते.
‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ आणि ‘गुरुपौर्णिमा’ या दोन चित्रपटांतून तू पुन्हा वेगळ्या भूमिकेत आणि लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. यावर तिला विचारले असता सई म्हणाली, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ हा चित्रपट हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणी यांची प्रेमकथा आहे. यात मी ‘आलिया खान’ या मुस्लीम तरुणीची भूमिका क रत आहे. माझ्या आजवरच्या भूमिकेपेक्षा ती खूप वेगळी आहे. अशी भूमिका मी आधी केली नव्हती. भूमिकेची वेषभूषा आणि लूक वेगळा आहे.काही दिवसांपूर्वी सईने ‘जो उमेदवार जास्त पैसे देईन त्याचा आपण प्रचार करू’ असे विधान करून धमाल उडवून दिली होती. यावरून प्रसार माध्यमातही चर्चा झाली होती. ‘बिनधास्त’ स्वभावातून हे विधान आले होते का, त्यावर स्पष्टीकरण देताना तिने सांगितले, एका मुलाखतीमध्ये अत्यंत ‘लाइट व्हेन’मध्ये मी ते विधान केले होते. त्याचा असा काही परिणाम होईल, हे मलाही वाटले नव्हते. पण ते प्रसिद्ध झाले आणि माझ्यावरच उलटले. खरे सांगायचे तर या निवडणुकीत मी कोणाचाही प्रचार केला नाही की कोणत्याही राजकीय पक्ष/प्रचार सभेलाही मी गेले नाही. पण ते होऊन गेले..
सईने आत्तापर्यंत विनोदी, गंभीर, रहस्यमय, कौटुंबिक आदी प्रकारच्या चित्रपटांतून विविध भूमिका केल्या आहेत. यापुढेही ती ‘बिनधास्त’ आणि ‘ग्लॅमरस’ प्रतिमा जपणारी आणि ‘सौ. शशी देवधर’ किंवा आगामी ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’सारख्या मराठी चित्रपटातून वेगळ्या भूमिकेत दिसणारी सई आणखी कोणत्या वेगळ्या भूमिकेत दिसते का? याकडे प्रेक्षकांचे आणि तिच्या चाहत्यांचेही लक्ष लागले आहे.

बिनधास्तपणा हा काही ठरवून झालेला नाही. चौकटीबाहेरचा विचार करायला मी सुरुवात केली. अमुक एक गोष्ट झाली पाहिजे, केली पाहिजे, असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची सुरुवात आपण स्वत:पासूनच का करू नये?, असा विचार मी केला आणि माझ्याकडून होऊन गेले.