गेल्या वर्षी सिक्वल आणि रिमेकच्या नादात भरकटलेले बॉलीवूडचे तारू यावर्षी मात्र मूळ कथा आणि पटकथांवर आले आहे. सिक्वल आणि रिमेकच्या जोरावर कोटय़वधींचा नफा मिळवता आला असला, तरी केवळ त्यांच्या जोरावर ही आर्थिक आघाडी कायम टिकवता येणार नाही, याची जाणीव बॉलीवूडच्या नामांकित निर्मिती संस्थांनाही झाली आहे. त्यामुळे यशराज, व्हायकॉम, यूटीव्ही, फॉक्सस्टारसारख्या मोठमोठय़ा बॅनर्सनी वेगवेगळे साहित्य, कथा-कादंबऱ्या, वास्तव घटनांवर आधारित चित्रपटांना प्राधान्य दिले आहे. नवे चेहरे, नव्या कथा आणि जुन्या कलाकारांना घेऊन केलेले नवे प्रयोग अशा हटके चित्रपटांची एक मोठी यादी यावर्षीसाठी तयार झाली आहे. २०१४ मध्ये वेगळे ठरतील अशा काही निवडक चित्रपटांची ही झलक..
यावर्षीची सुरुवातच सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटाने होणार आहे. त्यापाठोपाठ आमिर खानचा ‘पीके’ आणि शाहरुख खानचा ‘हॅप्पी न्यू इअर’ हे आत्तापासूनच चर्चेत असलेले चित्रपट आहेत.
‘जय हो’ आणि ‘किक’
कलाकार : सलमान खान, तब्बू, सुनील शेट्टी, डेझी शाह, सना खान
दिग्दर्शक : सोहैल खान
‘स्टॅलिन’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘जय हो’कडून सलमानला खूप अपेक्षा आहेत. गेल्यावर्षी एकही चित्रपट देऊ न शकलेल्या सलमानने यावर्षीच्या सुरुवातीलाच आपला दबदबा निर्माण करण्यासाठी ‘जय हो’ची जय्यत तयारी केली आहे. पोलिसाच्या भूमिके तून मेजरच्या भूमिकेपर्यंत सलमानची बढती झाली आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे सोहैल आणि सलमान हे दोघे भाऊ बऱ्याच काळानंतर दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून एकत्र येत आहेत. गेली तीन वर्षे अरबाझबरोबर ‘दबंग’गिरी सुरू असल्याने सलमानला सोहैलचा चित्रपट करता आला नव्हता. अभिनेत्री तब्बूचे नायिका म्हणून पुनरागमन हेही या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे.
तर यावर्षी ईदच्या मुहूर्तावर खास आपला चित्रपट असावा म्हणून सलमानने साजिद नाडियादवालाबरोबर ‘किक’ चित्रपटाची भट्टी जमवली आहे. ‘किक’ नावाप्रमाणेच अ‍ॅक्शनपट आहे पण गंमत म्हणजे या चित्रपटाची पटकथा सलमानने खास प्रसिद्ध लेखक चेतन भगतकडून लिहून घेतली आहे. सलमान, जॅकलीन आणि रणदीप हुडा यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट सलमानच्या चाहत्यांसाठीही खास असणार आहे.
पीके
कलाकार : आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपूत
दिग्दर्शक : राजकुमार हिरानी
आमिर खान आणि राजकुमार हिरानी ही जोडी दीर्घकाळानंतर पुन्हा एकत्र येते आहे. या जोडीच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा तिकीटबारीवर रेकॉर्डब्रेक कमाई के ली. २०० कोटींच्या घरात पोहोचलेला पहिला सिनेमा हा या जोडीचा होता. आता २०१३ची अखेर करताना आमिरच्याच ‘धूम ३’ने २०० कोटींपेक्षाही जास्त कमाई करत यशाचे नवे मापदंड निर्माण केले असल्याने पुनरागमनात ही जोडी ‘पीके’च्या माध्यमातून नवा रेकॉर्ड करणार, अशीच बॉलीवूडची अटकळ आहे.
 ‘हॅप्पी न्यू इअर’
कलाकार : शाहरुख खान, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, सोनू सूद
दिग्दर्शक : फराह खान
फराहचे दिग्दर्शन असलेला ‘ओम शांति ओम’ हा चित्रपट शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण या जोडीला अमाप यश देऊन गेला. आता हे त्रिकूट पुन्हा ‘हॅप्पी न्यू इअर’च्या निमित्ताने एकत्र येते आहे. पण, यावेळी त्यांच्या गँगमध्ये अभिषेक बच्चन, सोनू सूद आणि नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा इमाद असे आणखी काही कलाकार सामील झाले आहेत. शाहरुखसाठी तिकीटबारीच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा चित्रपट आहे. त्याचवेळी आणखी एका चित्रपटाची शाहरुखने घोषणा केली आहे. ‘फॅन’ नावाच्या या चित्रपटात शाहरुख पुन्हा एकदा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ‘बँड बाजा बरात’फेम दिग्दर्शक मनीष शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
 बँग बँग
कलाकार : हृतिक रोशन, कतरिना कैफ
दिग्दर्शक : सिद्धार्थ आनंद
हॉलीवूडच्या ‘अँजेलिना’ या जोडीच्या ‘नाईट अँड डे’ या चित्रपटाचा अधिकृत रिमेक असलेला ‘बँग बँग’ हा यावर्षीचा बिग बजेट चित्रपट आहे. कतरिना कै फ आणि हृतिक रोशन ही जोडी पडद्यावर आधी यशस्वी ठरली आहे आणि ‘अँजेलिना’च्या जागी अगदी चपखल बसली आहे. हा चित्रपट हृतिक आणि कतरिना दोघांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे.
 ‘सिंघम २’
कलाकार : अजय देवगण, करीना कपूर
दिग्दर्शक : रोहित शेट्टी
यावर्षी अजय देवगण सिक्वल मूडमध्ये असणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीचा मानसपुत्र बाजीराव सिंघम दुसऱ्यांदा परतणार आहे. मात्र, यावेळी त्याच्याबरोबर नायिका म्हणून करीना कपूर असणार आहे. करीना आणि अजय ही जोडी रोहितच्या ‘गोलमाल’ चित्रपट मालिकेत आधीच यशस्वी ठरली आहे. सिंघमच्या प्रेमाखातर लोक येणारच त्यामुळे हाही हिट आणि दुसऱ्या हिटसाठी अजयनेही यावर्षी अ‍ॅक्शनचा हुकूमी एक्का असलेल्या दिग्दर्शक प्रभुदेवाबरोबर जोडी जमवली आहे. या चित्रपटात अजयबरोबर सोनाक्षी सिन्हा आणि यामी गौतमी अशा दोन अभिनेत्री आहेत.
‘इट्स एंटरटेन्मेट’, ‘गब्बर’ आणि ‘हॉलिडे’
इट्स एंटरटेन्मेट
कलाकार : अक्षय कुमार, तमन्ना भाटिया, सोनू सूद
दिग्दर्शक : साजिद-फरहाद
अक्षय कुमार नेहमीप्रमाणे संपूर्ण मनोरंजनाच्याच प्रेमात आहे त्यामुळे यावर्षी त्याचे तिन्ही चित्रपट हे मसाला एंटरटेन्मेट आहे किंबहुना त्याच्या चित्रपटाच्या नावातच ‘एंटरटेन्मेट’ आहे. ‘गोलमाल’, ‘रेडी’ सारख्या चित्रपटांचे लेखक साजिद-फरहाद हे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून शुभारंभ करत आहेत.
अक्षयसाठी दुसरा महत्वाचा चित्रपट आहे तो म्हणजे संजय लीला भन्साळींची निर्मिती असलेला ‘गब्बर’ ज्यात सोनाक्षी नायिका आहे. आणि तिसरा चित्रपट पुन्हा एकदा दक्षिणेतील प्रसिध्द दिग्दर्शक ए. आर. मुरूगडोस यांच्या ‘थुप्पकी’ या तामिळ हिट चित्रपटाचा रिमेक ‘हॉलिडे’. ‘हॉलिडे’मध्ये पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि श्रुती हसन ही जोडी पडद्यावर दिसणार आहे.
‘जग्गा जासूस’
गेल्यावर्षी ‘यह जवानी है दिवानी’ म्हणत १०० कोटी क्लबमध्ये दाखल झालेला अभिनेता रणबीर क पूर यावर्षी अभिनेता आणि निर्माता अशा दोन्ही भूमिकांचे आव्हान पेलताना दिसणार आहे. ‘बर्फी’च्या यशानंतर रणबीर आणि अनुराग बसू या जोडीने ‘पिक्चर शुरू’ नावाचे नवे बॅनर सुरू केले असून ‘जग्गा जासूस’ हा त्यांच्या या बॅनरचा पहिला चित्रपट असणार आहे. ज्यात कतरिनाच रणबीरची नायिका म्हणून दिसणार आहे.
तर अनुराग कश्यपचा ‘बॉम्बे वेल्वेट’ हा रणबीरसाठी महत्वाकांक्षी म्हणता येईल असा चित्रपट आहे. मुंबई शहरातील बदलत गेलेल्या प्रेमाची कथा सांगणारी चित्रत्रयी म्हणजे ‘बॉम्बे वेल्वेट’ हा ध्यास अनुरागने घेतला आहे. यात अनुष्का शर्मा ही रणबीरची नायिका असून श्रीलंकेत चित्रपटातली मुंबई चित्रित झाली आहे.
मुख्य प्रवाहातील चित्रपटांच्या गर्दीतही वेगळे वाटतील असे आणखी काही चित्रपट आतापासूनच लक्ष वेधून घेत आहेत. त्यात सुशांत सिंग राजपूतची मुख्य भूमिका असलेला दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टिव ब्योमकेश बक्षी’, फरहान अख्तर आणि विद्या बालनची ही जोडी पहिल्यांदाच पडद्यावर आणणारा ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘इशकजादे’चा दिग्दर्शक हबीब फैजल यांचा पूर्ण वेगळा वाटावा असा ‘दावत-ए-इश्क’, ज्यात परिणीती आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. संजीवकुमार यांच्या दुहेरी भूमिकांनी गाजवलेल्या ‘अंगूर’ या विनोदी चित्रपटाचा रिमेक ‘हमशकल्स’. साजिद खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून सैफ अली खान, बिपाशा बासू आणि रितेश देशमुख यांच्या यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेला ‘क्वीन’, सैफ अली खान-इलियाना आणि करीना कपूर असे त्रिकूट असलेला राज-कृष्णा डीके जोडीचा ‘हॅप्पी एंडिंग’, इलियाना, वरुण धवन आणि नर्गिस फाकरी यांचा ‘मैं तेरा हीरो’, ज्याचे दिग्दर्शन खुद्द डेव्हिड धवन यांनी केले आहे. वरुणचीच मुख्य भूमिका असलेला ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ असे चित्रविचित्र नावांचे पण वेगळे चित्रपट हे २०१४ चे आकर्षण ठरणार आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित ‘हायवे’ हा एक संपूर्ण नवीन प्रयोगशील चित्रपटही याच वर्षी पाहायला मिळणार आहे.