सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर सोहळा अखेर पार पडला. अमेरिकेतील लॉस एंजलिस शहरामध्ये डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा संपन्न झाला. यंदा ‘जोकर’, ‘पॅरासाइड’ आणि ‘1917’ या चित्रपटांना पुरस्काराने गौरवण्यात आलं. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये भारतीय चित्रपटांनी छाप पाडली नसली तरीदेखील भारतीय संगीताची झलक मात्र पाहायला मिळाली.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर बॅकग्राऊंडला ऑस्कर पुरस्कार पटकवलेल्या ओरिजनल गाण्यांचा मोंटाज सुरु होता. या मोंटाजमध्ये बॉलिवूड चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याचाही समावेश होता. २२ जानेवारी २००९ मध्ये ८१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘जय हो’ या गाण्याला बेस्ट ओरिजन साँगचा पुरस्कार मिळाला होता. तसंच या गाण्यासाठी लोकप्रिय संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमानला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

वाचा : सलमानचा बॉडीगार्ड म्हणतो, ‘हा’ ठरणार बिग बॉस १३ चा विजेता

दरम्यान, यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वात जास्त अपेक्षा ‘जोकर’ या चित्रपटाकडून होत्या. कारण या चित्रपटाने सर्वाधिक ११ नामांकनं मिळवली होती. परंतु या चित्रपटाला केवळ दोन पुरस्कार पटकावता आले. त्या खालोखाल ‘1917’ या चित्रपटाला १० नामांकने मिळाली होती. मात्र त्यांनाही केवळ दोनच पुरस्कारांवर समाधान मानावे लागले.