बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने मंगळवारी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी त्याची पत्नी, अभिनेत्री काजोल आणि आईसुद्धा त्याच्यासोबत होती. सोशल मीडियावर सध्या त्याच्या कोल्हापूर भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. पारंपरिक वेशात यावेळी अजय आणि काजोलने अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यासोबतच अंबाबाईची ओटीसुद्धा भरली.

अजय, त्याची आई आणि काजोल हे तिघंही मंगळवरी सकाळी खासगी विमानाने कोल्हापूरला रवाना झाले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीला अभिषेक घालत तिचं दर्शनही घेतलं. यावेळी मंदिर परिसरात कोल्हापूरकर, चाहत्यांनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. काजोल आणि अजयला पाहण्यासाठी आलेल्या गर्दीला आवरण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वाचा : ‘व्हायरल’ची गंभीर साथ!

कोल्हापूरात अंबाबाईच्या दर्शनाला येण्याची ही काही त्यांची पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांपासून हे दोघंही कुटुंबियांच्या साथीने देवीच्या दर्शनाला येत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असणाऱ्या अजयने वेळात वेळ काढून कोल्हापूरला भेट दिली. काही दिवसांपूर्वीच तो ‘रेड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या बॉक्स ऑफिसवर त्याच्या या चित्रपटाने चांगलीच कमाई केली असून, दिवसेंदिवस हा कमाईचा आकडा वाढतच आहे.