‘रुस्तम’ या चित्रपटात खिलाडी कुमारने वापरलेल्या नौदल अधिकाऱ्याचा पोषाख लिलावात विकण्यात येणार असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं. ज्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनीच या मुद्द्याला उचलून धरत ट्विंकल खन्नावर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. नौदल अधिकाऱ्याच्या पोषाखाचा लिलाव करुन त्यापासून मिळणारे पैसे अक्षय एका स्वयंसेवी संस्थेला देणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं होतं. ज्याचं ट्विंकलने समर्थन केलं. पण, तिच्यावर एका नौदल अधिकाऱ्याने नाराजी व्यक्त केली.

पोषाखाच्या लिलावाच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या मुद्द्यावरुन ‘न्यू इंडिया कॉन्ल्वेव्ह’ या कार्यक्रमात ज्यावेळी अक्षयला काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा, त्याने आपल्या पत्नीची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. ‘सहाजिकच मी तिचं समर्थन करतो. मुळात आम्ही दोघांनी जो निर्णय घेतला आहे तो एका चांगल्या हेतूनेच घेतला आहे. मी माझ्या पत्नीची साथ देतच राहणार, कोणाला याविषयी काय वाटतंय त्याने मला काहीच फरक पडत नाही’, असं अक्षय म्हणाला.

वाचा : UPSC results: मदरशातील शिक्षकाची यशोगाथा, जिंकली केंद्रीय लोकसेवा आयोगाची शर्यत

दरम्यान, धमकी देणाऱ्यांविरोधात आपण कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ट्विंकलने दिला होता. टीका करत धमकी देणाऱ्या अहलावत यांच्याविरोधात कारवाई करण्याचा इशारा ट्विंकलने दिला आहे. लेफ्टनंट कर्नल संदीप अहलावत यांच्यावर तोफ डागत ट्विंकलने ट्विटमध्ये लिहिलं होतं, ‘सामाजिक कार्यासाठी चित्रपटात वापरल्या गेलेल्या गणवेशाचा लिलाव करण्याविरोधात अशाप्रकारे धमकी देणं कितपत शोभनीय आहे? याचं उत्तर मी धमक्यांच्याच भाषेत न देता योग्य ती कारवाई करून देईन.’

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रुस्तम’ या चित्रपटात नौदल अभिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या खिलाडी कुमारने काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. ज्यामधून त्याने चित्रपटात वापरलेला नौदल अधिकाऱ्याच्या पोषाखाचा लिलाव करत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर ट्विंकलनेही याविषयीची पोस्ट करत आपल्या फॉलोअर्सना याविषयीची माहिती दिली होती. पण, त्यानंतर बऱ्याच वादांना तोंड फुटलं.