अभिनेता शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. खिलाडी अक्षय कुमारचा आगामी ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ आणि शाहरुखच्या अद्यापही शीर्षक न ठरलेल्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असून, हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजेच ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे बॉलिवूडकरांचं हे ‘स्टार वॉर’ चांगलेच रंगणार यात शंका नाही. त्यामुळे या चित्रपटांच्या प्रसिद्धीमध्ये आणि बॉक्स ऑफिसवरही दोन्ही कलाकारांचे कसब आणि लोकप्रियता पणाला लागणार आहे.

एका बिग बजेट चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशीच शाहरुखचाही चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याच्या ‘दिलवाले’, ‘जब तक है जान’ आणि ‘रईस’ या चित्रपटांना अनुक्रमे ‘बाजीराव-मस्तानी’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘काबिल’ या चित्रपटांचे आव्हान होते. चित्रपटांच्या या लढतीमध्ये लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या शाहरुखच्या चित्रपटांनाही काही प्रमाणात फटका बसला ही बाब नाकारता येणार नाही. त्यामुळे आता खिलाडी कुमारच्या चित्रपटासमोर उभा ठाकलेला किंग खानचा हा तूर्त निनावी चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होणार का, याकडे प्रेक्षक आणि समीक्षकांच्याही नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी आणि किंग खान एकमेकांसमोर उभे ठाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. हे आहेत शाहरुख आणि अक्षयचे एकाच दिवशी प्रदर्शित झालेले काही चित्रपट..
‘वीर झारा’- ‘ऐतराज’ (२००४)- शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘वीर झारा’ आणि अब्बास मस्तान दिग्दर्शित ‘ऐतराज’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. ‘ऐतराज’मध्ये अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांमध्ये ‘वीर झारा’ने जास्त कमाई करत ‘ऐतराज’ला मागे टाकले होते.

‘डॉन’- ‘जान-ए-मन’ (२००६)- ‘डॉन’च्या निमित्ताने शाहरुख आणि अक्षय पुन्हा एकदा समोरासमोर आले होते. शाहरुख खानची मुख्य भूमिका असणारा ‘डॉन’ आणि प्रिती झिंटा, अक्षय कुमार, सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘जान-ए-मन’ या दोन्ही चित्रपटांमध्येही शाहरुखच्या ‘डॉन’ने बाजी मारली होती. त्यामुळे आता तिसऱ्यांदा बाजी मारत किंग खान चित्रपटाच्या यशाची हॅटट्रिक पूर्ण करणार की खिलाडी कुमारच्या चित्रपटाचे पारडे जड असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.