चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांच्या खासगी आयुष्यासोबतच आणखी एका गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी बऱ्याचजणांमध्ये कुतूहल पाहायल मिळते. ती गोष्ट म्हणजे कलाकारांचे मानधन. सध्याच्या घडीला बॉलिवूड कलाकारांविषयी सांगावे तर अगदी हजारापासून सुरु झालेला हा आकडा कोट्यवधींच्या घरात पोहोचला आहे. याच आकड्यांच्या बळावर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादीही समोर आली आहे. अभिनेता अक्षय कुमारचाही या यादीत समावेश होतो.

कोणाचाही वरदहस्त नसताना हिंदी चित्रपटसृष्टीत आलेल्या अक्षयचा ‘खिलाडी कुमार’ होण्यापर्यंतचा प्रवास सर्वांनाच ठाऊक आहे. पण, त्याला पहिल्याच चित्रपटासाठी किती मानधन मिळाले होते, हे तुम्हाला माहितीये का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खिलाडी कुमारच्या कोणत्याही मुलाखतीची आठवण करण्याची गरज नाही कारण, काही दिवसांपूर्वीच ‘मिड- डे’ला दिलेल्या मुलाखतीतच त्याने त्याने याबाबतचा खुलासा केला. अक्षयला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी मानधन म्हणून अवघे पाच हजार रुपये मिळाले होते हे तुम्हाला माहितीये का?

तिच आठवण सांगताना अक्षय म्हणाला, ‘त्या दिवशी सकाळी मी उठलो आणि व्यायाम करण्यास सुरुवात केली. मॉडेलिंग असाइंन्मेंटसाठी मला बंगळुरुला जायचे होते आणि त्यासाठी माझ्या विमानाची वेळही निघून गेली होती याचा मला अंदाजही नव्हता. त्यावेळी सकाळी ६ वाजता माझी फ्लाइट होती, पण मला फ्लाइट संधाकाळी आहे असे वाटले आणि सर्व गोंधळ झाला. तेव्हा त्या एजन्सीतील एका व्यक्तीने माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर टीका करत मी आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही, असे म्हटले होते.’

वाचा : अभिनेते लिलीपूट यांच्यावर कर्जाचा डोंगर, मुलीने…

पण, आयुष्यातील ती एक चूक अक्षयला खऱ्या अर्थाने फळली असे म्हणायला हरकत नाही. कारण, त्याच दिवशी नीरज स्टुडिओमध्ये काही कामासाठी गेला असता चित्रपट निर्माते- दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती यांच्या मेकअपमॅनने अक्षयच्या फोटोंचा अल्बम पाहण्यासाठी म्हणून गेला आणि त्यानंतर त्याला आत बोलवण्यात आले. त्यावेळी खुद्द अक्षयलाही धक्काच बसला होता. कारण, सर्व गोष्टी त्याच्यासाठी फार अनपेक्षित होत्या. याविषयीच सांगताना पुढे तो म्हणला, ‘मला त्यावेळी आश्चर्याचा धक्काच बसला. कारण चक्रवर्ती यांनी मला सर्वात पहिला चेक दिला. त्याच वेळी त्यांनी माझी तीन चित्रपटांसाठी निवड केली होती. त्यांनी मला पहिल्या चित्रपटासाठी ५०००, दुसऱ्या चित्रपटासाठी ५०,००० आणि तिसऱ्या चित्रपटासाठी १ लाख ५ हजार रुपयांचा चेक दिला होता. त्यांनी मला चेक दिले तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते.’ त्यावेळी आपण बंगळुरुला गेलो असतो तर या सर्व गोष्टी शक्यच झाल्या नसत्या, असे म्हणत जे होते ते चांगल्यासाठीच होते हा मुद्दा त्याने अधोरेखित केला.