‘हमे जिंदगी बस एक बारही मिलती है… तो उसे जी भर के जियो’, असं म्हणत अनेकजण आयुष्याचा मनमुराद आनंद लुटतात. कधी बंधंनांना झुगारुन, कधी स्वत:ला आव्हानं देत, कधी नशिबाच्या खेळीवर मात करत तर कधी स्वत:च्या सीमा ओलांडत आयुष्य जगण्याकडेच अनेकांचा कल असतो. असं दिलखुलास आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींच्या यादीत बी- टाऊन सेलिब्रिटींच्याही नावाचा समावेश होतो. कॅमेरा, चित्रीकरण, अभिनय, चाहत्यांची प्रशंसा या साऱ्यापासून दूर जात सेलिब्रिटीसुद्धा बऱ्याचदा सर्वसामान्य आयुष्य जगत काही आनंदाच्या क्षणांचा अनुभव घेतात. अशा या सेलिब्रिटींच्या यादीत अग्रस्थानी नाव येतं ते म्हणजे अभिनेता अक्षय कुमार याचं.

खिलाडी कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयने आपल्या रोजच्या जगण्यातून काहीतरी हटके अनुभव घेण्याच्या उद्देशाने रविवारची सुट्टी सद्कारणी लावली. जुहू बीच येथे काही तरुण व्हॉलीबॉल खेळत असल्याचं पाहून अक्षयला त्याचा मोह आवरला नाही आणि तोसुद्धा त्या मुलांसोबत व्हॉलीबॉल खेळू लागला. खुद्द अक्षयनेच सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ‘या मुलांसोबत जुहू येथील समुद्रकिनाऱ्यावर आज, रविवारच्या सकाळी व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतला. लहानसहान गोष्टीच मोठा पल्ला गाठतात, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे… तर मग तुम्ही सुदृढ राहण्यासाठी काय करताय?’, असं म्हणत अक्षयने चाहत्यांनाही सुदृढ राहण्यासाठी ते नेमक्या कोणत्या मार्गाचा अवलंब करत आहेत, याविषयीचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यास सांगितलं.

वयाच्या पन्नाशीचा आकडा गाठला असतानाही अक्षयने कधीच त्याच्या शारीरिक सुदृढतेशी तडजोड केलेली नाही. त्यामुळे त्याच्या या वृत्तीचा अनेकांनाच हेवा वाटतो.

VIDEO : अशी होती प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती

अनोख्या अंदाजात रविवारच्या सुट्टीचा आनंद घेणारा अक्षय सध्या बऱ्याच महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. येत्या काळात तो सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘२.०’ या चित्रपटातून खलनायकी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, सध्या तो ‘केसरी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणातही व्यग्र आहे. १८५७ मध्ये लढल्या गेलेल्या सारागढीच्या युद्धावर ‘केसरी’ या चित्रपटाचं कथानक आधारित आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांचं लक्षही खिलाडी कुमारच्या या महत्त्वाच्या चित्रपटांकडे लागून राहिलं आहे.