हिंदी चित्रपटसृष्टीत कालाकारांच्या गर्दीत आपलं वेगळेपण जपून ठेवण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांमध्येही तितकंच वैविध्य असतं. असा हा अभिनेता वैष्णोदेवी मातेचाही भक्त आहे. इतकंच काय तर आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून खिलाडी कुमार नेहमीच देवीच्या दर्शनासाठी जायचा. मुख्य म्हणजे दर सहा महिन्यांनी तो वैष्णोदेवी धामला भेट द्यायचा. पण, आता मात्र अक्की असं काहीच करत नाहीये. एकाएकी त्याला झालं तरी काय? असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? अक्षयने स्वत:च या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणादरम्यान खिलाडी कुमारने वैष्णोदेवी दर्शनाबद्दल सांगितलं. ‘मी दर सहा महिन्याला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मू-काश्मीरला जायचो. प्रत्येकवेळी साधारणत: दोन ते तीन लाख रुपये खर्च व्हायचे. याशिवाय येण्या-जाण्याचा आणि राहण्या-खाण्याचा खर्च वेगळा. एक दिवस अचानक, हे तीन-चार लाख रुपये एखाद्या गरजूला का दिले तर… असा प्रश्न विचार माझ्या मनात आला. त्यानंतर मी असंच केलं’, असं म्हणत गरिबांची सेवा केल्यामुळे त्यांच्यातच आपल्याला देवीचं दर्शन घडल्याची भावना अक्षयने व्यक्त केली.

‘मी ज्या गरजूंना मदत केली, त्या त्या गरजूंमध्ये मला माता वैष्णोदेवीचे दर्शन लाभलं. त्यानंतरच वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मू-काश्मीरला जाण्याची गरज नाही, याची जाणीव मला झाली.’, असं म्हणत खिलाडी कुमारने त्याचा हा वेगळा अनुभव सर्वासमोर शेअर केला.

खिलाडी कुमारच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर सध्या तो ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावर जास्त लक्ष केंद्रित करतो आहे. याशिवाय अक्की यंदाच्या वर्षी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘गोल्ड’, ‘मोगुल’ या चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटांची नावं पाहता प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा हा एक अनोखा नजराणा असणार यात शंकाच नाही.