बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. अय्यिलिदीज तिम तुर्कीश सायबर आर्मीने त्यांचे अकाऊंट हॅक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून आता त्यांचे ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले आहे. अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यावरून अमिताभ बच्चन यांचा फोटो काढून त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. तसेच त्यांच्या प्रोफाईलवर लव पाकिस्तान असा संदेशही लिहिण्यात आला होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने त्यांचा अकाऊंट पुन्हा पूर्ववत करण्यात आला.


दरम्यान, हॅकर्सने आपल्या ट्विटमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो टाकून त्यांना टॅग केले होते. तसेच त्यावर लव पाकिस्तान असा संदेश लिहिण्यात आला होता. त्यानंतर अनेकांनी त्यावर रिट्विट करत याबाबत विचारणा केली. परंतु काही वेळाने अमिताभ बच्चन यांचा अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली.


तसेच यानंतर करण्यात आलेल्या अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी फुटबॉलचा उल्लेख केला आहे. आइसलँडने तुर्कस्थानच्या फुटबॉलपटूंना दिलेल्या वागणुकीचा त्यांनी निषेध केला. आम्ही शांतपणे बोलतो परंतु आमच्याकडे मोठी छडी आहे. हा एक मोठा सायबर हल्ला आहे, असेही त्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे. अशाप्रकारचा सायबर हल्ला यापूर्वीही झाला होता. 2014 मध्ये यूएनची अधिकृत वेबसाईटही हॅक करण्यात आली होती. तसेच यावर्षी इस्त्रायलची डिफेंस सिस्टमही हॅक करण्यात आली होती.