काही बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अशाच कलाकारांच्या यादीतील दोन नावं म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा. रुपेरी पडद्यावरील सर्वांची आवडती जोडी म्हणून या दोन्ही कलाकारांकडे पाहिलं गेलं. पण, त्याहीपेक्षा त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीविषयीच जाणून घेण्यात प्रेक्षकांनी रस दाखवला. अमिताभ बच्चन यांची कारकिर्द, रेखा यांचं चिरतरुण सौंदर्य आणि या दोघांच्या नावाभोवती असणारं त्यांच्या नात्याचं वलय म्हणजे सिनेरसिकांच्या चर्चेचा आवडता विषय.

रेखा आणि बिग बी यांच्या प्रेमाचा ‘सिलसिला’ नेमका कसा होता याविषयी बऱ्याच गोष्टींचा उलगडा करण्यात आला. किंबहुना खासगी आयुष्याविषयी हात राखून बोलणाऱ्या रेखाविषयीसुद्धा बऱ्याच गोष्टींचा खुलासा झाला. प्रत्येक वेळी बच्चन यांच्यासोबतचं त्यांचं नातं नव्याने सर्वांसमोर येत गेलं. पण, काही गोष्टी मात्र निरुत्तरितच राहिल्या. चला तर मग, या नात्याविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेऊया.

१. अमिताभ आणि रेखा यांनी ‘दो अंजाने’ या चित्रपटातून पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती.

२. रेखा यांनी बिग बींसोबतच्या नात्याविषयी काही मुलाखतींमध्ये आपलं मन मोकळं केलं. पण, अमिताभ, जया यांनी मात्र याविषयी मौन पाळणंच उत्तम समजलं.

३. ‘सिलसिला’ या चित्रपटाने बिग बी, रेखा आणि जया हा प्रेमाचा त्रिकोण सर्वांसमोर आणला. यश चोप्रा यांच्या चित्रपटातील ही स्टारकास्ट या तिघांच्याही आयुष्याला वेगळं वळण देऊन गेली.

४. अभिनेत्री सिमी गरेवालच्या ‘रेन्देवज’ Rendezvous या कार्यक्रमात मुलाखत देताना रेखा यांनी अमिताभ यांच्यासोबतच्या नात्याविषयी खुलेपणाने आपलं मत मांडलं होतं. त्यावेळी रेखा यांना खासगी विषयांवर भाष्य करण्यासाठी बोलतं केल्याबद्दल सिमी यांची प्रशंसाही करण्यात आली होती. पण, आपण काहीच खास केलं नसून, रेखासोबत एका चांगल्या मैत्रिणीप्रमाणेच गप्पा मारल्या असं सिमी यांनी स्पष्ट केलं होतं.

५. या मुलाखतीत रेखा यांनी बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला होता. एक अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांनी रेखाला काय देऊ केलं, हा प्रश्न विचारताच त्याचं उत्तर देत त्या म्हणाल्या होत्या, ‘बऱ्याच गोष्टींमध्ये मी त्यांच्यापेक्षा मोठी आहे… मात्र अशा दिग्गज अभिनेत्यासमोर उभं राहणं, त्यांच्यासोबत काम करणं काही सोपं नाही.’

६. यावेळी ‘दो अंजाने’मध्ये अमिताभ यांच्यासोबत काम करण्याविषयी त्यांनी बरीच माहितीसुद्धा दिली. “मला जेव्हा कळलं, की ‘दो अंजाने’साठी अमितजी तयार झाले आहेत. तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं. कारण, त्यावेळी दीवार नुकताच प्रदर्शित झाला होता. ते यशाच्या शिखरावर होते. मी त्यांना फक्त दीदीभाई (जया बच्चन) यांचे पती म्हणून ओळखून होते. त्याव्यतिरिक्त आमची काहीच ओळख नव्हती. कारण कधी त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधीही मला मिळाली नव्हती. पण, जेव्हा मी त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली तेव्ही मात्र माझ्यावर फार दडपण होतं. चित्रपटाच्या सेटवर त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. किंबहुना चित्रपटाच्या सेटकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोनही त्यांच्यामुळेच बदलला”, असं रेखा म्हणाल्या होत्या.

७. आपण इतक्या सहजासहजी कोणापासूनही प्रभावित होत नाही. असं रेखा यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केलं होतं. पण, बिग बी मात्र याला अपवाद ठरले असही त्यांनी न चुकता सांगितलं. ‘मी कोणापासूनही प्रभावित होत नाही. पण, ते (बिग बी) अद्वितीय होते. अशी व्यक्ती मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.’

८. या कार्यक्रमात अमिताभ यांच्याबद्दल भरभरुन बोलणाऱ्या रेखा यांना सूर गवसला होता. त्यामुळे संधी साधत सिमी यांनी अखेर तो प्रश्न विचारलाच. रेखा कधी अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या होत्या का? असं विचारताच त्याचं उत्तर देत रेखा म्हणाल्या, हा प्रश्नच चुकीचा आहे. त्या महान अभिनेत्यावर हजारो, लाखो लोक प्रेम करतात. तर मग माझ्यासाठीच हा वेगळा प्रश्न का? रेखा यांनी मोठ्या चतुराईने हे उत्तर फिरवलं. त्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

रेखा यांचं कोड्यात बोलणं आणि काही खासगी गोष्टी मोठ्या शिताफीनं आपल्यापर्यंतच सिमीत ठेवणं याचंच उदाहरण या कार्यक्रमातही पाहायला मिळालं होतं. आजही बॉलिवूडमधील बहुर्चित प्रेमप्रकरणांमध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याचा उल्लेख होतो आणि पुन्हा त्यांच्या प्रेमाचा ‘सिलसिला’ चर्चेत येतो.