12 December 2018

News Flash

Women’s Day 2018 : कलाकारांचा कायापालट करणारी ‘ती’

तिची खूप प्रशंसा झाली

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर

कोणत्याही चित्रपटात एखादं पात्र साकारते वेळी रुपेरी पडद्यावर कॅमेऱ्याच्या नजरेतून ते पात्र किती प्रभावीपणे सादर करण्यात येतं याला अतिशय महत्त्व आहे. ज्यामध्ये कलाकारांच्या अभिनयासोबतच मोलाचा वाटा असतो तो म्हणजे मेकअप आर्टिस्टचा. सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये अशाच एका मेकअप आर्टिस्टच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात शाहिद, रणवीर आणि दीपिकाच्या पात्रांना आणखी उठावदारपणे सादर करण्यासाठीसुद्धा तिची खूप प्रशंसा झाली. ती… राष्ट्रीय पुरस्कार विजेती ती मेकअप आर्टिस्ट म्हणजे, प्रितीशिल सिंह.

मेकअप, हेअर आणि प्रॉस्थेटिक डिझायनर म्हणून ओळखली जाणारी प्रितीशिल सध्या इंडस्ट्रीत बरीच प्रसिद्ध आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटात त्यांच्या मेकअपसाठीसुद्धा तिचीच निवड करण्यात आली असून, तिने ही जबाबदारी लिलया पेलल्याचं चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर पाहताच लक्षात येत आहे. कलाविश्वातील दोन मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करण्यासाठीचा अनुभव प्रितीशीलसाठी खूपच खास होता. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार त्याविषयीच अधिक माहिती देत ती म्हणाली, ‘अभिनेता म्हणून हे दोन्ही कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते, तेव्हा मी अगदी लहान होते. त्यांच्यासाठी चित्रपटातील लूक डिझाइन करणं हे माझ्यासाठी एक आव्हानच होतं. पण, त्या दोघांच्याही भूमिकांविषयी मला देण्यात आलेली माहिती आणि त्यांची प्रतिभा पाहता दोघांच्याही व्यक्तीमत्वाला साजेसा लूक साकारण्यावर मी भर दिला.’

मेकअप करतेवेळी समोरच्या व्यक्तीचा स्वत:वर असणारा संयमही तितकाच महत्त्वाचा असतो. त्याविषयीच सांगताना प्रितीशिल म्हणाली, ‘त्या दोघांचंही वय पाहता, मेकअपसाठी एका ठिकाणी इतका वेळ बसून राहणं आणि त्यानंतर पुन्हा अभिनयासाठी तयार राहणं हे तसं कठीण काम. पण, इतकी वर्षे या कलाविश्वात काम करुनही एखाद्या गोष्टीवषयी त्यांच्या मननात असणारं कुतूहल एखाद्या लहान मुलाप्रमाणे बाहेर येतं. कलेप्रती त्यांची समर्पक वृत्ती पाहून भारावून जायला होतं.’ बिग बी आणि ऋषी कपूर या दोन्ही कलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवातून प्रितीशिलला खूप काही शिकण्याची संधी मिळाली. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा तिच्या करिअरमधील एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

पाहा : VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग

दरम्यान, ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर, या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ आणि ऋषी यांची जोडी २७ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. वडिल आणि मुलाच्या नात्याची एक वेगळी बाजू या चित्रपटातून पाहण्याची संधी मिळणार आहे.

First Published on March 8, 2018 1:49 pm

Web Title: bollywood actor amitabh bachchan and rishi kapoors devotion to their art is awe inspiring movie 102 not out makeup artist preetisheel singh