द्रमुक प्रमुख आणि तामिळनाडूच्या राजकारणात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एम. करुणानिधी यांनी मंगळवारी जगाचा निरोप घेतला. ते ९४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून बिघडत असलेल्या प्रकृतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्या रुग्णालयात करुणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला तेथे बाहेर समर्थकांनी प्रचंड गर्दी करत शोक व्यक्त करण्यात सुरुवात केली. आपल्यातला नेता गेल्याचं दु:ख प्रत्येकानेच व्यक्त केलं. कलाविश्वही यात मागे राहिलं नाही.

सुपरस्टार रजनीकांत, कमल हसन आणि इतर कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहिली. धनुष आणि रजनीकांत यांनी त्यांच्या पार्थिवाचंही दर्शन घेतलं. या साऱ्यातच बिग बी अमिताभ बच्चन यांनीही करुणानिधी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. ‘आदरणीय आणि बहुविध क्षेत्रांमध्ये निपुण असणाऱ्या करुणानिधींसाठी….’, असं लिहित त्यांनी करुणानिधींचा फोटो पोस्ट केला. त्यासोबतच एक आठवणही सांगितली, ज्यावेळी बिग बींना पहिला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आपल्याला ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटासाठी जो राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, तो मला करुणानिधींच्याच हस्ते मिळाला होता, असंही त्यांनी या ट्विमधून सांगितलं. त्यावेळी ते चेन्नईच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असल्याचंही बिग बींनी त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट केलं.

वाचा : करुणानिधींच्या ‘त्या’ वाक्याचा इतिहास झाला

करुणानिधी यांच्या जाण्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणाक एक पोकळी निर्माण झाली आहे. आता येत्या काळात तेथील राजकीय घडामोडींकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलेलं असणार आहे. फक्त राजकारणच नव्हे, तर करुणानिधी यांनी तामिळ चित्रपटविश्वातही महत्त्वाचं योगदान दिलं होतं. पटकथाकार म्हणून त्यांनी समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या कथांना नेहमीच प्राधान्य दिलं होतं.