सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बऱ्याच सेलिब्रिटींनी चाहत्यांसोबत एक वेगळं नातं निर्माण केलं आहे. मुळात या माध्यमामुळे कलाकार आणि चाहत्यांमध्ये जी दरी असते ती बऱ्याच प्रमाणात कमी होते. असं असलं तरीही विविध विषयांवर आपली मतं मांडणाऱ्या सेलिब्रिटींना नेटकऱ्यांचे कटू शब्दही सहन करावे लागतात. अगदी महानायक अमिताभ बच्चनही सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार झाले आहेत. पण, या सर्व परिस्थितीमध्ये बिग बींनी एक उपाय शोधून काढला आहे. ज्याच्या मदतीने ते या ट्रोलर्सपासून दूर राहतात.

तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की, अमिताभ बच्चन सोशल मीडिया ट्रोलर्सपासून नेमके दूर राहतात तरी कसे? या प्रश्नाचं उत्तर खुद्द बिग बींनीच त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून दिलं आहे. निंदकांचे घर असावे शेजारी असं कितीही म्हटलं तरीही बिग बी आपली निंदा करणाऱ्यांकडे आणि खिल्ली उडवणाऱ्यांकडे कधीच लक्ष देत नाहीत याचा खुलासा त्यांनी ब्लॉगमधून केला आहे. ‘आपल्यावर प्रेम करणारी जवळची व्यक्ती सोशल मीडियावरील ट्रोल्सविषयी आपल्याला माहिती देतात आणि त्यानुसार मी कोणती गोष्ट कधी पोस्ट करायची याविषयी योग्य ती काळजी घेतो. या सर्व गोष्टींमध्ये मी स्वत:ची काळजी घ्यावी असंही माझा प्रशंसक मला सांगतो’, असं ते या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत.

अपशब्दांसाठी माझ्याकडे मुळीच वेळ नाहीये. उलटपक्षी कामासाठी, त्या व्यक्तीसाठी आणि या ब्लॉगसाठी माझ्याकडे वेळ आहे. अपशब्दांसाठी माझ्याकडे वेळ नसला तरीही मला या गोष्टी आवडत नाहीत, असं नाही. कारण या सर्व गोष्टी मला चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करत असतात’, असंही त्यांनी न विसरता स्पष्ट केलं आहे.

वाचा : ‘फोडा आणि राज्य करा हे भाजपाचे धोरण कर्नाटकात चालणार नाही’

आपल्याविषयी निंदा करण्याऱ्यांची तमा न बाळगणाऱ्या बिग बींचा हा अंदाज अनेकांसाठीच प्रेरणादायी ठरला असणार यात शंका नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘अॅव्हेंजर्स- इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाविषयी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी चित्रपटात काय चाललं आहे हे आपल्याला कळलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी निशाणा साधत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे बिग बीसुद्धा सोशल मीडिया ट्रोलिंगच्या या विळख्यात आले, असंच मत अनेकांनी मांडलं होतं.