भारतीय राजकारणातील एका महत्त्वाच्या पर्वावर भाष्य करणाऱ्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते अनुपम खेर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून सध्या मनमोहन सिंग यांच्या रुपातील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर कथानक असणाऱ्या या चित्रपटाविषयी खेर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. ‘मनमोहन सिंह यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. ते अशा काळात भारतीय राजकारणात सक्रिय होते, ज्यावेळी माध्यमांची सक्रियता प्रचंड वाढली होती. त्यांच्या व्यक्तीमत्वाविषयी अनेकांना, संपूर्ण जगाला बऱ्याच गोष्टी माहित होत्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मी त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी बराच अभ्यास केला. आता त्याचा फायदा मी चित्रपटासाठी करुन घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन’, असं ते म्हणाले.

वाचा : ‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी


काही काळासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असणाऱ्या संजय बारू लिखित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर- मेकिंग अँड अमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावर या बहुचर्चित चित्रपटाचं कथानक आधारित असणार आहे. या पुस्तकातून मनमोहन सिंह यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे चित्रपटाचं कथानक आणि त्यातील पात्र पाहता हा चित्रपट खऱ्या अर्थाने मल्टीस्टारर असेल असं म्हणायला हरकत नाही. अनुपम खेर यांच्या व्यतिरिक्त अभिनेता अक्षय खन्ना, अभिनेत्री आहाना कुमरासुद्धा या चित्रपटातून झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.