गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सातत्याने सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. मात्र, यावेळी तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. लवकरच त्याचा आगामी ‘नेल पॉलिश’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच अभिनेता रजित कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

काही दिवसांपूर्वी ‘नेल पॉलिश’ या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं. हे पोस्टर पाहिल्यानंतर हा चित्रपट कोर्ट रुम ड्रामा प्रकारातील असल्याचं स्पष्ट होत आहे. या पोस्टरमध्ये अर्जुनसोबत रजित कपूर दिसून येत आहे.

वाचा : ‘अतरंगी रे’चे दिग्दर्शक आनंद एल. राय यांना करोनाची लागण

१९९३ साली दूरदर्शनवर ब्योमकेश बक्षी ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेत रजित कपूर यांनी ब्योमकेश बक्षी ही भूमिका साकारली होती. याविषयी अर्जुनने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“मला चांगलं आठवतंय १९९३मधील ब्योमकेश बक्षी या भूमिकेत रजित कपूर यांना पाहिलं होतं. अत्यंत सुंदररित्या त्यांनी ही भूमिका साकारली होती. सहज सुंदर अभिनय काय असतो हे मला त्यांच्याकडून समजलं होतं. त्यानंतर जवळपास १७ वर्षांनंतर मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे”, असं अर्जुन म्हणाला. दरम्यान, ‘नेल पॉलिश’ हा एक कोर्ट रूम ड्रामा असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०२१ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.