बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी संसदेत बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटवरुन सुरु असलेल्या आरोपांवर बोलताना ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत असं म्हणत भाजपा खासदार रवी किशन आणि कंगना रणौतला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. त्यांच्या या भाषणाचं समर्थन होत असून काहीजण विरोध दर्शवत आहेत. दरम्यान पूर्वकाळजी म्हणून मुंबई पोलिसांनी बच्चन कुटुंबाला सुरक्षा पुरवली आहे. मुंबईमधील घराबाहेर मुंबई पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

“हिरोसोबत झोपल्यानंतरच…,” जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना कंगनाचा नवा आरोप
जया बच्चन यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बच्चन कुटुंबाच्या जुहू येथील जलसा बंगल्याबाहेर मुंबई पोलिसांची अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्यसभेतील भाषणानंतर जया बच्चन सोशल मीडियावर ट्रोल होत असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत जया बच्चन यांना ट्रोल करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

भाजपा खासदार रवी किशन यांनी राज्यसभेत बॉलिवूडमधील ड्रग्स सेवनाचा मुद्दा मांडला होता. त्यावरुन जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही”.

“ज्या ताटात खातात, त्याच ताटात…,” जया बच्चन यांचा रवी किशन यांना अप्रत्यक्ष टोला

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना जया बच्चन यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर अनेकांनी जया बच्चन यांना ट्रोल केलं असून #ShameOnJayaBachchan हॅशटॅग ट्रेंड केला आहे. शिवसेनेनेही सामना संपादकीयच्या माध्यमातून जया बच्चन यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.