X

फरहान अख्तरनं का केलं फेसबुकला अलविदा?

मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की...

तुमचं फेसबुक अकाऊंट सुरक्षित आहे का, ते सुरक्षित ठेवण्यासाठीचे उपाय माहितीयेत का, अशा बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पाहायला मिळत आहेत. फेसबुकवरील डेटा लीक प्रकरणी अनेकांनीच या सोशल नेटव्हर्किंग साइटवर असणारं आपलं अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. यामध्येच आता अभिनेता फरहान अख्तरच्या नावाचाही समावेश झाला आहे. मंगळवारी सकाळीच फरहाननं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली.

‘मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, मी स्वत:चं फेसबुक अकाऊंट डिलीट केलं आहे. असं असलं तरीही माझं अधिकृत फॅन पेज फेसबुकवर सुरु आहे’, असं त्यानं ट्विटमध्ये लिहिलं. सध्याच्या घडीला फेसबुकवरील डेटा लीकप्रकरणी सेलिब्रिटी बरीच सतर्कता बाळगत असून, त्यांनी थेट फेसबुंक अकाऊंट डिलीट केल्याचं पाहायला मिळत आहे.

फरहान अख्तरपूर्वी स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क, हॉलिवूड अभिनेता जिम कॅरी यांनीही त्यांचे फेसबुक अकाऊंट डिलीट केलं होतं. सध्याच्या घडीला सुरु असणारा फेसबुकचा वाद पाहता अगदी याच दरम्यान फरहाननेही फेसबुकला अलविदा केल्यामुळे या साऱ्याशी केंब्रिज अॅनालिटिकाचा वादही जोडला जात आहे. पण, फरहानने मात्र यामागचं कारण स्पष्ट केलं नसल्यामुळे त्याने हा निर्णय का घेतला हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

वाचा : 2018 मध्ये जगातील ‘टॉप ५००’ श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये २८,३४५ अब्ज रुपयांची घट

दरम्यान, या सर्व प्रकरणी काही दिवसांपूर्वीच मार्क झुकेरबर्गने फेसबुकवरुन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं होतं. फेसबुकच्या खातेदारांच्या विश्वासाला तडा गेला आहे. अशी चूक पुन्हा होणार नाही. माहितीची गोपनीयता कायम राखण्यासाठी पावलं उचलली जातील, मी तांत्रिक चूक केलीच, पण व्यावसायिकही चूक केली, असे झुकेरबर्गनं त्यात म्हटलं होतं.