हिंदी चित्रपटसृष्टीत ५० च्या दशकात सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री डेजी इराणी यांनी एक महत्त्वाचा खुलासा केल्यानंतर बऱ्याच चर्चांना उधाण आलं. वयाच्या सहाव्या वर्षी आपल्यावर बलात्कार झाल्याचं म्हणत डेजी यांनी त्या दुर्दैवी प्रसंगाविषयी सर्वांना माहिती दिली. त्यानंतर डेजी यांच्या धाडसाचं आणि त्यांच्या वृत्तीचं कौतुक करत सोशल मीडियावर अनेकांनीच त्यांना धीर दिला. अभिनेता फरहान अख्तरचाही यात समावेश आहे.

फरहानने ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या मावशीच्या म्हणजे डेजी यांच्यासोबतच्या त्या प्रसंगाविषयी खंत व्यक्त केली. पण, त्यासोबतच त्याने डेजी यांच्या धाडसाचं कौतुकही केलं. ‘डेजी आंटीविषयी वाचून खुपच वाईट वाटलं. पण, त्या प्रसंगाविषयी सर्वांसमोर उघडपणे बोलण्याचं पाऊल उचलणाऱ्या डेजी आंटीचा मला अभिमान वाटतोय. पालक आपल्या मुलांना यशस्वी होण्यासाठी, नाव कमावण्यासाठी बळजबरीने पुढे ढकलतात ही बाब अत्यंत निराशाजनक आहे. माझ्यामते संपूर्ण कलाविश्वासाठी हा एक इशाराच आहे….’, असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं.

वाचा : राधिका आपटेला का करावा लागला फोन सेक्स?

#MeToo च्या अंतर्गत डेजी यांनी फार वर्षांपूर्वीच्या त्या प्रसंगाविषयी वक्तव्य केलं. ‘ज्या व्यक्तिने माझ्यावर बलात्कार केला ती व्यक्ती माझा सांभाळ करत होती. तो ‘हम पंछी एक डाल के’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तो माझ्यासोबतच असायचा. एका रात्री मी ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्या रुममध्ये आला. मला बेल्टने मारल्यावर त्याने माझ्यावर अत्याचार केले. मला धमकीही दिली की जर मी हे कोणाला सांगितलं तर तो मला मारुन टाकेल’, असा खुलासा त्यांनी केला. डेजी यांच्या आईने त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी जबरदस्ती चित्रपटसृष्टीत काम करायला सांगितले होते. तेव्हापासून इराणी यांनी ५० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं.