उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे प्रजासत्ताक दिनी तिरंगा रॅलीच्या मुद्द्यावरुन शुक्रवारी दोन गटांत हिंसाचार झाला होता. जमावाच्या गोळीबारात चंदन गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला होता. कासगंजमधील हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारात तीन दुकाने, एक बस आणि कार जाळण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर चर्चेत आला आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर सध्या एका वेगळ्याच चिंतेत असल्याचे कळतेय. मुळात या ट्विटची तक्रारही फरहानने ट्विटर इंडियाकडे केली आहे. या ट्विटमध्ये आपल्या नावाचा वापर करत ते वक्तव्य व्हायरल केले जातेय, असे फरहानचे म्हणणे आहे. आपल्या नावाने चुकीचे वक्तव्य व्हायरल करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणीही फरहानने केली आहे.

एका ट्विटमुळे सध्या फरहान बराच अस्वस्थ असून, त्याने आपले चाहते आणि फॉलोअर्सनाही याविषयीची कल्पना दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची पडताळणी केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका, अशी कळकळीची विनंती त्याने नेटकऱ्यांना दिली आहे. दरम्यान, फरहानने ट्विटविषयी तक्रार केल्यानंतर ते ट्विट डिलीट करण्यात आले. पण, इतर नेटीझन्सनी काढलेल्या स्क्रीनशॉट्सच्या माध्यमातून हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

‘२६ जानेवारीला जुम्मा (शुक्रवार) होता. त्यामुळे त्या दिवशी मुस्लिम बहुल वस्तीमधून तिरंगा घेऊन मोर्चा काढत, ‘वंदे मातरम्’ आणि इतर चिथावणीखोर घोषणा दिल्या नसत्या तर हा हिंसाचार झाला नसता’, असे फरहान म्हणाल्याचे वृत्त सध्या चर्चेत आले होते. त्यासंबंधीचा एक फोटोसुद्धा अनेकांचेच लक्ष वेधत होता. आपल्या नावे हे असे भडकाऊ वक्तव्य व्हायरल केले जात असल्याचे पाहून शेवटी फरहानने ट्विट करत लिहिले, ‘हे भडकाऊ वक्तव्य मी केले नसून, माझ्या नावे ते व्हायरल करण्यात येत आहे. हे करणाऱ्या व्यक्तीबद्दल योग्य ती कारवाई करण्यात यावी.’ फरहानची ही मागणी आणि त्याने व्यक्त केलेली नाराजी पाहता आता येत्या काही दिवसांमध्ये त्याच्या नावे चुकीचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.