बॉलिवूडमधील 70 ते 80 च्या दशकात डोकावलं की एक नाव समोर येतं ते म्हणजे दिवंगत अभिनेता फारुख शेख. उत्कृष्ट आणि वैविध्यपूर्ण अभिनयाच्या जोरावर फारुख शेख यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. अनेक सुपरहिट सिनेमांमूधन त्यांनी चाहत्यांची मनं जिकली. तर टेलिव्हिजनवरील एक अप्रतिम सूत्रसंचालक अशी देखील त्यांची ओळख होती. अनेक टीव्ही शोंच त्यांनी सूत्रसंचालन केलं आहे.

फारुख शेख यांनी बॉलिवूड आणि या जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या अभिनयाची छाप आणि त्याचं काम चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिलं. फारुख शेख यांच्या जन्मतिथी निमित्ताने त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणुन घेणार आहोत.

25 मार्च 1948मध्ये फारुख यांचा गुजरातमध्ये जन्म झाला. मुंबईतील सेंट मेरी शाळेत त्यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं.

अभिनेता होण्याआधी होते वकिल
फारुख शेख यांना शालेय दिवसांपासून अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये वकिलीचं शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. मात्र अभिनयाची आवड कमी झाली नाही. त्यामुळे त्यांनी वकिली सोडून अभिनय क्षेत्रात नशीब आजमवायचं ठरवलं. फारुख शेख यांनी सुरुवातील विविध नाटकांमध्ये अभिनय केला. शबाना आझमी यादेखील फारुख यांच्यासोबत शिकत होत्या. यावेळी दोघांनी काही नाटकात एकत्र काम केलंय. ‘तुम्हारी अमृता’ हे त्यांचं नाटक त्यावेळी लोकप्रिय झालं होतं.

अभिनयातील करिअर
सागर सरहदी यांच्यासोबत त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतला. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गरम हवा’ या फाळणीवर आधारित सिनेमातू त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याच काळात हिंदी चित्रपटसृष्टीत येऊ घातलेल्या समांतर सिनेमांच्या प्रवाहात ते सामील झाले व ७०-८०च्या दशकात अनेक समांतर चित्रपटांतून दर्जेदार भूमिका वठवल्या. ‘शतरंज के खिलाडी’, ‘उमराव जान’, ‘बाजार’, ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’ हे त्यांचे सिनेमा केवळ समीक्षकांच्याच नव्हे तर सामान्य प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरले. सत्यजित राय, श्याम बेनेगल, हृषीकेश मुखर्जी यांसारख्या दिग्गजांसोबत त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं.

अभिनेत्री दिप्ती नवलसोबत हिट जोडी
फारुख शेख आणि दिप्ती नवल यांच्या ऑनस्क्रिन जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंची दिली. त्याकाळात दोघांची जोडी सुपरहिट ठरली होती. ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘साथ-साथ’, ‘रंग-बिरंगी’ अशा सिनेमांमधून दोघांच्या जोडीने चाहत्यांवर जादू केली.

(photo- indain Express Archive)

पहिल्या सिनेमासाठी मिळाले ७५० रुपये
फारुख शेख ‘गरम हवा’ या त्यांच्या पहिल्या सिनेमात फुकटात काम करणार होते. रमेश सथ्यू यांच्या या सिनेमासाठी त्यांना असा अभिनेता हवा होता ज्यानं कोणतही मानधन न घेता सिनेमासाठी वेळ द्यावा. यासाठी फारुख शेख मंजूर झाले. मात्र असं असलं तरी त्याना या सिनेमातील अभिनयासाठी त्याकाळी ७५० रुपये देण्यात आले तेही पाच वर्षांनंतर.

फारुख शेख सहज सुंदर अभिनयामुळे ते प्रेक्षकांचे ‘नायक’ बनले. लोकप्रियता मिळाल्यानंतर काही वर्ष ते सिनेसृष्टीपासून लांब राहिले. 2009 सालात आलेल्या ‘लाहोर’ सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2013 सालात आलेल्या रणबीर सिंगच्या ‘जवानी है दिवानी’ या सिनेमात त्यांनी रणबीरच्या पित्याची भूमिका साकारली होती. ‘यंगिस्तान’ हा फारुख खान यांचा शेवटचा सिनेमा होता. तर ‘जीना इसी का नाम है’ हा टेलिव्हिजनवरील त्यांचा शो प्रचंड लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांची त्यांनी मुलाखत घेतली. त्यांना बोलत केलं.
2013 सालात दुबईमध्ये हृदय विकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला.