गेल्या काही दिवसांपासून अभिनेता इरफान खान याच्या प्रकृतीविषयी अनेकांनीच चिंता व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याने केलेल्या ट्विटनंतर नेमका तो कोणत्या दुर्धर आजाराचा सामना करत आहे, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं समोर आली आहेत. खुद्द इरफाननेच ट्विट करत त्याला झालेल्या आजाराविषयी माहिती दिली आहे. इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour झाल्याचं निदान झालं आहे.

आयुष्याकडून आपल्या अपेक्षांप्रमाणेच सर्व गोष्टी मिळतातच असं नाही, अशा आशयाची मार्गारेट मिशेल यांची ओळ लिहित त्याने आपल्या आजाराविषयीची माहिती दिली.

आयुष्यात अशा काही अनपेक्षित गोष्टी घडतात ज्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. अगदी अशाच काहीशा परिस्थितीचा मी गेले काही दिवसांपासून सामना करत आहे. मला ‘न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर’ झाल्याचं समजलं. सध्या ही परिस्थिती कठिण आहे. पण, माझ्या सोबत असणारं इतरांचं प्रेम आणि त्यांच्याकडून मिळणारा धीर पाहता मला आशेचा किरण दिसतो आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी मला परदेशात जावं लागतंय. पण, तरीही मी सर्वांनाच विनंती करतो की, माझ्यावर तुमचं प्रेम असच कायम राहू द्या. असं तो म्हणाला.

आपल्या आजारपणाविषयी पसरणाऱ्या अफवांविषयीसुद्धा त्याने चिमटा काढणारं एक वाक्य लिहिल्याचं पाहायला मिळत आहे, न्यूरो म्हणजे नेहमीच मेंदूचा आजार नसतो. याविषयी अचूक माहिती आणि ‘संशोधन’ करायचं असल्यास गुगलची मदत घ्या, असंही त्याने लिहिलं आहे. इरफानने हे ट्विट करत आपण लवकरच बरं होऊन परत येण्याची आशा करत असल्याचंही चाहत्यांना सांगितलं आहे.