अभिनयाच्या ताकदीवर गेली अडीच-तीन दशके सामान्यांतील असामान्य व्यक्तिरेखांमध्ये प्राण ओतणारा कलावंत म्हणजे इरफान खान. प्रेक्षकांच्या मनात घर करण्यासाठी सुंदर दिसण्याची नाही, तर उत्तम अभिनयाची गरज असते हे इरफानने सिद्ध करुन दाखवलं. त्यामुळे २९ एप्रिल रोजी त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर सर्वच स्तरांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. इरफानने जगाचा निरोप घेतला तरीदेखील त्याच्या चित्रपटांमधून, अभिनयामधून तो आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यामुळे अजूनही त्याच्याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगतात. यातच सगळ्यांचा निरोप घेतलेल्या इरफानने त्याच्या पश्चात किती संपत्ती ठेवली आहे, याची चर्चा रंगताना दिसत आहे.

‘एनडीटीव्ही’नुसार, इरफान खान त्याच्या पश्चात जवळपास ३२० कोटींची संपत्ती ठेवून गेल्याचं म्हटलं जातं. यामध्ये त्याची वैयक्तिक गुंतवणूक, जुहूमधील फ्लॅट आणि मुंबईमधील आणखी एक घर, लक्झरी कार अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर त्याने ११० कोटींची वैयक्तिक गुंतवणूक केली होती. तसंच त्याच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये ४-५ कोटी किंमतीच्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.

दरम्यान, इरफान एका चित्रपटासाठी साधारणपणे १५ कोटींचं मानधन घेत होता. तर जाहिरातींसाठी तो ५ कोटी रुपये घ्यायचा. विशेष म्हणजे सर्वाधिक आयकर भरणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये त्याचं नाव होतं. छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या इरफानने हॉलिवूडपर्यंत बाजी मारली होती. २०१८ मध्ये इरफानला न्यूरोएन्डोक्राईन टय़ुमर हा दुर्धर आजार झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्यावर लंडनमध्ये उपचारही सुरु होते. योग्य उपचार घेतल्यानंतर दीड-दोन वर्षांनी तो मुंबईत परतला होता. परंतु त्याला पूर्णपणे बरं वाटतं, नव्हतं त्याच्यात शारीरिक थकवा होता. यातच त्याच्या आईचं जयपूरमध्ये निधन झालं आणि त्यानंतर बरोबर तीन दिवसांनी इरफान खानने मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.