अभिनेता इरफान खान सध्या परदेशात दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर झाल्याचं सांगत काही दिवसांपूर्वी इरफानने त्याच्या आजारपणाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. गेले बरेच दिवस तो परदेशात असून या आजारावर सध्या उपचार घेत आहे.

परदेशात असणारा इरफान येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही सध्या म्हटलं जात आहे. ‘हिंदी मिडीयम २’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी लंडनमध्ये जाऊन इरफानची भेट घेतली असून, त्याने या चित्रपटाच्या कथानकाला पसंती दिल्याचं वृत्त बॉलिवूड लाइफने प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे आता इरफान येत्या काळात ‘हिंदी मिडीयम २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्य म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टींविषयी माहिती देणाऱ्या इरफानने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी अद्यापही कोणतीच माहिती दिलेली नाही.

वाचा : Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिंदी मिडीयम’ या चित्रपटातही इरफान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरही झळकली होती. साकेत चौधरी दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकत काही पुरस्कारांवरही मोहोर उमटवली होती. तेव्हा आता या चित्रपटाचा दुसरा भागही त्याच ताकदीने बॉक्स ऑफिसवर चमकतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा होमी अदजानिया यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं कळत आहे.