X

जवळपास दोन महिन्यांनंतर इरफान आलाय चाहत्यांच्या भेटीला…

सोशल मीडियाच्याच माध्यमातून त्याने आपल्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour झाल्याचं निदान झालं आहे, अशी एक पोस्ट केली होती.

आपल्या दर्जेदार अभिनयाच्या बळावर संपूर्ण चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खान सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर आजाराशी झुंजणारा हा अभिनेता जवळपास दोन महिन्यांनतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

‘कारवाँ’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने इरफानने एक फोटो पोस्ट केला असून काही सुरेख ओळी त्या फोटोसोबत लिहिल्या आहेत. ”कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीच्या वेळी असणारी निरागसता विकत घेता येत नाही…दलकर आणि मिथिला या ‘कारवाँ’शी जोडले गेले आहेत… त्याबद्दल त्यांचे आभार. सध्या दोन ‘कारवाँ’ सुरु आहेत, एक म्हणजे मी आणि दुसरा म्हणजे चित्रपट”, असं तो या पोस्टमधून म्हणाला आहे.

वेब विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी अभिनेत्री मिथिली पालकर या चित्रपटातून मल्याळम सुपरस्टार दलकर सलमानसोबत झळकणार आहे. १० ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेच, पण त्यासोबतच खुद्द इरफानने त्याविषयी केलेली पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये एक आनंदाची लाट उसळली आहे.

काही दिवसांपूर्वी इरफानने आपण एका दुर्धर आजाराशी झुंज देत असल्याचं स्पष्ट केलं होतं. सोशल मीडियाच्याच माध्यमातून त्याने आपल्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour झाल्याचं निदान झालं आहे, अशी एक पोस्ट केली होती. तेव्हापासून त्याच्या प्रकृतीविषयी चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं होतं. सध्या तो परदेशात असून या आजारावर उपचार घेत आहे. येत्या काळात त्याच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होऊन तो मायदेशी परतेल अशी चाहत्यांना आशा आहे.

वाचा : लग्नसोहळ्यात सहकार्य केलेल्या प्रत्येकालाच सोनम म्हणतेय…