काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेले ज्येष्ठ अभिनेते कादर खान आता आजारपणामुळे खंगले असून, त्यांना बोलतानाही त्रास होत आहे, असं वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने प्रसिद्ध केले. कादर खान यांच्या सुनेने यासंबंधीची माहिती दिली. चित्रपटसृष्टीत आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या खान यांच्याविषयी माहिती मिळताच प्रेक्षकांनीही चिंता व्यक्त केली.

खान यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती देत सून शाहिस्ता खान म्हणाल्या, ‘त्यांना बोलताना खूपच त्रास होत आहे. ते काय बोलतात हे फक्त मी आणि माझे पतीच समजू शकतो. बोलण्यात अडथळा येत असला तरीही त्यांची स्मृती चांगली असून, ते सर्वांना ओळखत आहेत.’ त्यांच्या प्रकृतीविषयी फार काळजी करण्याची गरज नाही. कारण, वय वाढल्यामुळेच त्यांना हा त्रास होत असल्याचेही शाहिस्ता यांनी सांगितले. म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असते. त्यामुळे कादर खान यांची नातवंडं सायमा आणि हम्जासुद्धा त्यांना लहान मुलाप्रमाणे सांभाळत आहेत, त्यांची काळजी घेत आहेत.

काही वर्षांपूर्वी कादर खान यांच्या गुडघ्यावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्याचं म्हटलं जात होतं. पण, तसं काहीच नसून, शस्त्रक्रिया अगदी व्यवस्थित पार पडली होती असं त्यांचा मुलगा सरफराजने स्पष्ट केलं. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार खान यांनी हालचाल करण्यास नकार दिल्यामुळेच त्यांना हा त्रास झाल्याचंही त्याने स्पष्ट केलं. आपल्या वडिलांची प्रकृती स्थिर असून, ते माझ्या कुटुंबासमवेत सुखी आयुष्य जगत आहेत, असंही सरफराज म्हणाला.

कादर खान सध्या कॅनडामध्ये आहेत, त्यामुळे ते भारतात कधी परतणार, असा प्रश्न विचारला असता सरफराज म्हणाला, ‘माझे वडील कॅनडाचे नागरिक आहेत. त्यांची इथे नीट काळजीही घेतली जात आहे. काही दिवसांसाठी आम्ही भारतात नक्कीच येऊ. पण, आता ते चित्रपटात काम करु शकतील असं मला वाटत नाही. कारण, त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.’

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

सरफराजला ‘अपेक्षाभंग’ या शब्दातून नेमकं काय म्हणायचं होतं असं विचारल्यास तो म्हणाला, ‘सध्या चित्रपटसृष्टीची सूत्र वेगळ्या पद्धतीने चालत आहेत. इथे व्यवसायीकरण वाढलं आहे. मैत्री आणि इतर सर्व गोष्टी नाहीशा झाल्या आहेत. आता प्रत्येकाला आपल्या कामाशी घेणंदेणं आहे. यामुळे माझ्या वडिलांची बरीच निराशा झाली होती.’ सरफराच्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे आता कादर खान यांच्या सहकलाकारांची यावर काय प्रतिक्रिया असणार, या अभिनेत्याकडे चित्रपटसृष्टीचं लक्ष जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.