बॉलिवू़ड अभिनेत्री मल्लिका शेरावत पॅरिसमध्ये अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यातून सुदैवाने बचावली.  शुक्रवारी ११ नोव्हेबरला मल्लिका शेरावतवर काही अज्ञातांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. पॅरिसमधील अपार्टमेंटमध्ये रात्री साडे नऊच्या सुमारास मल्लिकावर हे संकट ओढावले. बॉयफ्रेंड सिरले ऑक्सेनफॅन्स सोबत घरी पोहचल्यानंतर चेहऱ्यावर नकाब घालून लपून बसलेल्या अज्ञातांनी मलिकावर हल्ला केला. अश्रू धूराचा वापर करुन हल्लेखोरांनी बॉयफ्रेंड आणि मल्लिकाला मारहाण केली होती.

पॅरिसमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोर चोरीच्या इराद्याने मलिकाच्या अपार्टमेंटमध्ये घुसले होते. शुक्रवारी घडलेल्या या भयानक प्रकाराची मल्लिकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांत तक्रार दाखल करुनही अद्याप हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. ज्या ठिकाणी मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडवर हल्ला करण्यात आला त्याच ठिकाणी मागील महिन्यात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार किम कार्दाशियावर हल्ला करण्यात आला होता.

बॉलिवूड चित्रपटांतील बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावत ही सध्या सिरले ऑक्सेनफॅन्स या फ्रेंच उद्योजकासोबत डेटिंग करत आहे. मल्लिका आणि सिरले हे गेले काही वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आपल्या प्रेमाची सर्वांसमोर ग्वाही दिली होती. लवकरचं ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा देखील बॉलिवूड जगतात रंगल्या होत्या. मल्लिकाच ‘मर्डर’, ‘ख्वाहिश’, ‘प्यार के साइड इफेक्टस’ या चित्रपटांची बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली होती. बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत गेल्या अनेक दिवसांपासून ६० एमएमच्या पडद्यापासून दूरच आहे. तिचा आगामी चित्रपट कधी येणार याचीच वाट तिचे चाहते पाहत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मल्लिका पॅरिसमध्ये वास्तव्यास आहे.