शतकानुशतकं समाजामध्ये तेढ निर्माण करणारा जातीवाद अजूनही टिकून असल्याचंच दिसतं. जातीवादाच्या अनेक घटना वारंवार समोर येतात आणि पुन्हा त्यावरून चर्चा सुरू होते. हाथरस प्रकरणावरून जातीवादाचा मुद्दा चर्चेत असून, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकनं त्याला आलेल्या जातीवादाच्या अनुभवाबद्दल मौन सोडलं आहे. नवाजुद्दीननं गावात राहत असताना आलेल्या अनुभव सांगितले आहेत. एनडीटिव्हीनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

“मी एक अभिनेता असो किंवा एखादा घडगंज श्रीमंत याच्याशी माझ्या गावकऱ्यांना काही घेणंदेणं नाही. ते या सगळ्यापेक्षा जातीला जास्त महत्त्व देतात. इतकंच नाही तर लग्नाच्या बाबतीतही ते परंपरा आणि प्रथा पाळणारे आहेत. आमच्या समाजात जातीभेदाची मूळ फार खोलवर गेली आहेत. माझी आजी मागास जातीतील होती. त्यामुळे गावातील काही लोकांनी आमच्या कुटुंबाला स्वीकारलं नाही”, असं नवाज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “आमचं कुटुंब शेख होतं. तर माझी आजी ही मागास जातीतील होती. त्यामुळे गावातील अनेक लोक आमच्याकडे कायम कुत्सित नजरेनं पाहात”.

बॉलिवडूमध्ये यशाच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या नवाजुद्दीनलाही जातीवादाचा जवळून अनुभव घ्यावा लागला. अलिकडेच नवाजुद्दीनचा ‘सीरिअस मॅन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात नवाज मुख्य भूमिकेत झळकला असून त्याने अय्यन ही व्यक्तीरेखा साकारली होती. या चित्रपटात अय्यन हा तामिळ दलित असल्याचं दाखविण्यात आलं आहे. सीरिअर मॅनचं दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केलं आहे.