राज्यासह देशात करोनाचं संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलं आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतेय. एकीकडे लसीकरण सुरु करण्यात आलं असलं तरी करोनाचा धोका वाढत असल्यानं नागरिकांनी पुन्हा एकदा सर्व नियमांचं पालन करावं अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत.

बॉलिवूडमध्ये देखील करोनाच्या संकटामुळे चिंता वाढू लागली आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आणि आमिर खान, आर माधवन तसचं मिलिंद सोमण यांना करोनाची लागण झाली आहे. यातच आता अभिनेते आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे खासदार परेश रावल यांना करोनाची लागण झाल्याचं समोरं आलं आहे.

अभिनेते परेश रावल यांनी ट्विट करत स्वत: करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. “दूर्दैवाने माझा कोव्हि़ड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दहा दिवसात जे कुणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कृपया करोना टेस्ट करावी.” असं ट्विट करत परेश रावल यांनी संपर्कात आलेल्यांना टेस्ट करण्याचं अवाहन केलं आहे.

महत्वाची बाब म्हणजे १८ दिवसांपूर्वीच म्हणजेच 9 मार्चला परेश रावल यांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. यावेळी ट्विट करत त्यांनी याची माहिती चाहत्यांना दिली होती. परेश रावल यांनी लस घेतानाचा फोटोदेखील शेअर केला होता. ” V फॉर व्हॅक्सीन. सर्व डाक्टर, नर्स, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि शास्त्रज्ञांचे आभार” असं ट्विट त्यांनी केलं होतं. मात्र लस घेऊन काही दिवस उलटत नाही तर परेश रावल यांना करोना संसर्गाची लागण झाली.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या ‘तुफान’ या सिनेमातून परेश रावल लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. फरहान अख्तरची या सिनेमात मुख्य भूमिका असून तो एका बॉक्सरच्या भूमिकेत झळकणार आहे. तर परेश रावल हे या सिनेमात कोचची भूमिका साकारताना दिसतील.