चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आणि बऱ्यापैकी नावाजलं गेल्यानंतर कलाकारांची एक वेगळी ओळख निर्माण होते. अभिनेता रणबीर कपूरचीही अशीच एक ओळख आहे. ‘चॉकलेट बॉय’ या नावाने ओळखला जाणारा रणबीर खऱ्या आयुष्यात मात्र फार वेगळा आहे. समंजस, मोठ्यांचा आदर करणारा आणि जाईल त्या ठिकाणी सर्वांची मनं जिंकणारा हा अभिनेता चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. पण, करिअरच्या वाटेत यशासोबत अशाही काही सवयी त्याला जडल्या ज्यामुळे तो संकटातही सापडला असता.
एकेकाळी रणबीर अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. यासंबंधी त्यानेच एका कार्यक्रमादरम्यान खुलासा केला होता. फार कमी वयात आपल्याला अमली पदार्थांचं व्यसन लागलं होतं, असंही ‘सावरिया’ रणबीरने स्पष्ट केलं होतं. एकदा तर चित्रपटाच्या दृश्याआधीसुद्धा त्याने ड्रग्स घेतले होते.

ज्या चित्रपटातील दृश्यासाठी रणबीरने अमली पदार्थांचं सेवन केलं होतं तो चित्रपट म्हणजे, ‘रॉकस्टार’. या चित्रपटातील रणबीरच्या अभिनयाची अनेकांनीच प्रशंसा केली होती. पण, त्याच्या अभिनयामागे असं काहीतरी गुपित दडलं असेल याची कोणी कल्पनाही केली नसावी. इम्तियाज अली दिग्दर्शत ‘रॉकस्टार’मधील एका दृश्याच्या वेळी रणबीर खूपच अस्वस्थ झाला होता. त्या वेळी काय करावं हेच त्याला कळत नव्हतं. शेवटी त्याने ड्रग्जचं सेवन केलं आणि त्या दृश्याचं चित्रीकरण पूर्ण केलं.

वाचा : माहेरचा गणपती : चैतन्य, भरभराट आणि उत्साहाची उधळण करणारा माझा नवसाचा बाप्पा- अक्षया गुरव

शालेय दिवसांपासूनच रणबीर व्यसनाधीन गेल्याचं म्हटलं जातं. त्याची ही सवय दिवसेंदिवस वाढतच गेली आणि प्रत्येक वेळी अस्वस्थ वाटू लागल्यावर तो ड्रग्जचं सेवन करु लागला. ज्यामुळे त्याची तब्येतही बिघडू लागली होती. या वाईट सवयीमुळे रणबीरचे त्याच्या वडिलांसोबत म्हणजेच ऋषी कपूर यांच्यासोबतही बरेच वाद झाले होते. आपली ही सवय आता हाताबाहेर गेली असल्याचं लक्षात येताच वेळीच रणबीरने त्यावर आळा घालत, स्वत:ला सावरलं. सध्याच्या घडीला तो अशा कोणत्याही व्यसनाच्या आहारी नसून पूर्णवेळ चित्रपटांवरच लक्ष केंद्रीत करत आहे.