ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होणऱ्या अभिनेता ऋषी कपूर यांचं रौद्र रूप पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. एक कार्यक्रमामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांचा राग अनावर झाला. गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर यांना त्याच्या मुलाविषयी म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरविषयी बरेच प्रश्न विचारले जात आहेत. न्यूयॉर्कमध्ये रणबीर पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खानसोबत धुम्रपान करताना दिसला होता. मनोरंजन क्षेत्रात सध्या याचीच चर्चा असून, ऋषी कपूर यांच्यावरही रणबीरविषयीच्याच प्रश्नांचा मारा केला जात आहे.

या सर्व प्रश्नांचा होणारा मारा पाहता, ऋषी यांच्या रागाचा बांध फुटला आणि माध्यमांच्या प्रतिनिधींवर त्यांनी आगपाखड केली. ‘नवभारत टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार एका कार्यक्रमात आपल्याला रणबीरविषयीचे प्रश्न विचारले जातील याच चिंतेने त्यांनी चिडचीड करण्यास सुरुवात केली. पत्रकार, छायाचित्रपकार, पीआर यांनाही त्यांच्या रागाचा सामना करावा लागला.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

या कार्यक्रमात ऋषी यांनी सर्वांनाच खडसावून सांगितलं की, ‘जर कोणी मला उलटसुलट प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला मारेन. आपापसात तुम्ही कोणतीही कुजबूज करणार नाही. ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलो आहोत, त्याविषयीच प्रश्न विचारा.’ माध्यमांच्या प्रतिनिधींना हा इशारा दिल्यानंतर कपूर यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पीआरला माध्यमांतर्फे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबत काळजी घेण्याचा इशारा दिला. ‘माध्यमांच्या या प्रतिनिधींना तर फक्त खुसखुशीत बातम्या हव्या असतात. माझ्या चांगल्या बोलण्याचं त्यांना काहीच घेणंदेणं नाही. बघतोच ते मला काय विचारतात ते’, असंही ते म्हणाले. संपूर्ण कार्यक्रमातच ऋषी कपूर यांचा पारा चढला होता. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीवर माध्यमांच्या प्रतिनिधींना धारेवर धरत होते.