प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या साखरपुड्याच्या चर्चांमध्येच आणखी एका सेलिब्रिटी जोडीविषयी बऱ्याच चर्चांना सध्या उधाण आलं आहे. ती सेलिब्रिटी जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण. रणवीर आणि दीपिका यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असून, या विवाहसोहळ्याकडेच चाहत्यांच्या आणि संपूर्ण कलाविश्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

दीपिका आणि रणवीरने अद्यापही त्यांच्या लग्नाच्या बातमीविषयी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, येत्या काळात करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोच्या नव्या पर्वात ही जोडी हजेरी लावणार आहे. तेव्हा आता या चॅट शोधमून त्यांच्या नात्याची अधिकृत ग्वाही दिली जाणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. करणच्या कार्यक्रमात हजेरी लावणं दीपिका आणि रणवीरसाठी नवं नाही. पण, हे दोघंही एकत्र या कार्यक्रमात आले तर, त्यांच्या गप्पांची रंगत खऱ्या अर्थाने वाढेल यात वादच नाही.

वाचा : लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणं पडलेलं महागात – नीना गुप्ता

दरम्यान, करणच्या चॅट शोचं हे पर्व बरंच खास असणार आहे. कारण, या चॅट शोच्या पहिल्याच भागासाठी प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा पती, निक जोनास उपस्थिती लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे करणच्या या चॅट शोमुळे जणू काही सेलिब्रिटी जोडप्यांच्या नात्यांना एक वेगळा टच मिळत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.