विविध विषयांवर आपलं मत नोंदवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ब्रिटिश एअरवेजला फटकारलं आहे. एका भारतीय कुटुंबाने आपल्याला वर्णद्वेषी वागणूक दिल्याचा आरोप ब्रिटिश एअरवेजवर केला होता. कुटुंबातील तीन वर्षीय लहान मुल रडल्यामुळे त्या विमानातून आपल्या कुटुंबाला खाली उतरवण्यात आल्याचा आरोप एका भारतीय कुटुंबाने केला होता. सोशल मीडियावरही या मुद्द्यावर अनेकांनीच आपलं मतं मांडली, संतप्त प्रतिक्रिया दिल्या. यात अभिनेते ऋषी कपूरही मागे नव्हते.

‘वर्णद्वेषी ब्रिटिश एअरवेजमधून प्रवासच करु नका. आम्हाला ते अशी वागणूक देऊ शकत नाहीत. बर्लिनच्या च्या प्रसंगाविषयी ऐकून मन खिन्न झालं. मी स्वत:सुद्धा त्यांच्या अशा कारभारामुळे ब्रिटिश एअरवेजने प्रवास करणं बंद केलं आहे. प्रथम श्रेणी प्रवासी असूनही मी दोनदा अशा प्रसंगांना सामोरं गेलो आहे. यापेक्षा जेट किंवा एमिरट्सने प्रवास करा, तिथे तुमचा आदर केला जातो’, असं म्हणत त्यांनी ब्रिटिश एअरवेजला फटकारलं आहे.

हाती आलेल्या वृत्तानुसार विमान उड्डाणासाठी सज्ज असताना काही वेळ आधी ही घटना घडली. या मुलाला त्याची आई शांत करण्याचा प्रयत्न करत असताना केबिन क्रूच्या सदस्यांनी या मुलाला दाटवणीच्या स्वरात शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते मूल अधिक घाबरलं आणि त्यानं आणखी जोरात रडण्यास सुरुवात केली. ज्यानंतर विमान पुन्हा टर्मिनलमध्ये नेण्यात आलं. जिथे त्या कुटुंबाला आणि त्यांच्यामागे बसलेल्या भारतीयांनाही खाली उतरवण्यात आलं.

वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

भारतीय इंजिनिअरींग सर्व्हीसच्या १९८४ बॅचच्या अधिकाऱ्याच्या कुटुंबासोबत २३ जुलै रोजी ब्रिटीश एअरवेजच्या लंडन-बर्लिन (बीए ८४९५) फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला होता. सध्या हा अधिकारी रस्ते वाहतूक मंत्रालयात कार्यरत आहे. या अधिकाऱ्याने हवाई उड्डयाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे या प्रकाराबाबत तक्रार केली आहे.