बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सध्या ते ट्विटरवर आपले जुने फोटो शेअर करत आहेत. नुकतंच त्यांनी अजून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो अत्यंत मौल्यवान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या फोटोत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हातात लहान बाळ दिसत आहे. हातातील हे बाळं दुसरं तिसरं कोणी नसून ऋषी कपूर आहेत.

हा फोटो शेअर करताना ऋषी कपूर यांनी लिहिलं आहे की, “नमस्कार लताजी, तुमच्या आशिर्वादाने मला दोन किंवा तीन महिन्यांचा असतानाचा फोटो मिळाला आहे. मला नेहमीच तुमचा आशीर्वाद लाभला आहे. तुमचे खूप आभार. हा फोटो ट्विटरवर टाकून माझ्यासाठी किती मौल्यवान आहे हे जगाला सांगू शकतो का? माझ्यासाठी हा फोटो खूपच मौल्यवान आहे”.

ऋषी कपूर यांच्या ट्विटवर लता मंगेशकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “नमस्कार ऋषीजी. फोटो पाहून मला खूप आनंद झाला. मला हा फोटो सापडत नव्हता. हा फोटो पाहून मला कृष्णा वहिनी आणि राजसाहेब यांची आठवण आली. या फोटोत वहिनींनी तुम्हाला माझ्या हातात दिलं होतं. तुम्ही सगळ्यांसोबत शेअर केलं फार बरलं झालं. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना”.

सध्या ऋषी कपूर दीपिकासोबत ‘द इंटर्न’ चित्रपटाच्या रिमेकसाठी तयारी करत आहेत. २०१५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास, निवृत्तीनंतरच्या आयुष्याला कंटाळल्यामुळेएक वयस्कर व्यक्ती सीनिअर सिटिजन प्रोग्राम अंतर्गत कंपनीत इंटर्नशिप मिळण्यासाठी अर्ज करतो. चित्रपटात ऋषी कपूर वयस्कर व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार असून दीपिका त्यांच्या बॉसच्या भूमिकेत असणार आहे.