सेलिब्रिटी कपल्स म्हटलं की, अनेकांच्याच तोंडी काही नाव आवर्जुन येतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. सुरुवातीपासूनच ही जोडी चर्चेत होती. रितेश आणि जेनेलिया नेहमीच सोशल मीडियावरुनही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. नुकतच त्यांच्या या सुपरक्युट केमिस्ट्रीची आणखी एक बाजू पाहायला मिळाली आहे. रितेशच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन ही सेलिब्रिटी जोडी पुन्हा एकदा सर्वांना ‘कपल गोल्स’ देत आहे असंच म्हणावं लागेल.

जेनेलियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हॅप्पी बर्थडे बायको…तू अप्रतिम आहे. माझी खास मैत्रीण आहेस…’ असं म्हणत त्याने जेनेलियाचं कौतुकही केलं आहे. त्यासोबतच त्याने लिहिलेल्या एका ओळीने अनेकांचीच मनं जिंकली आहेत. ‘बिन तुम्हारे मै बिखर जाता’, असं म्हणत रितेशने त्याच्या आयुष्यातील जेनेलियाचं स्थान सर्वांसमोर आणलं आहे.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

२०१२ मध्ये रितेश आणि जेनेलिया विवाहबद्ध झाले होते. त्याआधी जवळपास ८ वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत होते. जेनेलियासुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय होती. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनीही २००३ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लग्नाला तीन वर्षे होऊनही त्यांच्या नात्यामध्ये प्रेमाचा गोडवा अजूनही टिकून आहे. रितेश- जेनेलिया ‘तुझे मेरी कसम’, ‘मस्ती’ आणि ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या चित्रपटांमधून पडद्यावर एकत्र दिसले. लग्नानंतर जेनेलियाने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं. जेनेलिया सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही काही कार्यक्रमांना ती रितेशसोबत आवर्जुन हजेरी लावते.