सध्या बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपट लोकांना आवडत असतानाच दुसरीकडे इतिहासासोबत छेडछाड करण्यात आल्याचाही आक्षेप नोंदवला जात आहे. दरम्यान सैफ अली खानने एका मुलाखतीत बोलताना तान्हाजी हा ऐतिहासिक चित्रपट नसल्याचं म्हटलं आहे. तसंच चित्रपटावरुन सुरु असलेल्या राजकारणावर बोलताना आपल्याला एक अभिनेता म्हणून काहीच समस्या नाही पण एक व्यक्ती म्हणून नक्कीच आहे असंही त्याने सांगितलं. अजय देवगणची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात सैफ अली खानने उदयभान सिंह राठोडची भूमिका निभावली आहे.

चित्रपटामध्ये काही ऐतिहासिक घटनांशी छेडछाड किंवा बदल करण्यात आल्यासंबंधी विचारलं असता सैफने सांगितलं की, “काही गोष्टींमुळे मी मत मांडत नाही. कदाचित पुढच्या वेळी मांडेन. पण ही भूमिका अत्यंत सुंदर असल्याने ती करण्यासाठी मी उत्साही होतो. पण जेव्हा लोक म्हणतात की हाच इतिहास आहे. तर मला तसं वाटत नाही. इतिहास काय आहे हे मला नीट माहिती आहे,” असं सैफ अली खानने म्हटलं आहे. इंग्रज येण्याआधी भारत ही संकल्पना नव्हती असंही यावेळी सैफने सांगितलं.

“भूमिका घेणाऱ्या इंडस्ट्रीचा भाग होणं आवडेल”
‘तान्हाजी’सारखे चित्रपट बॉलिवूडमध्ये येत असल्यासंबंधी बोलताना सैफने सांगितलं की, “हेच लोकांना आवडचं आणि म्हणूनच ही संकल्पना चालली. पण मला वास्तवात अशा इंडस्ट्रीचा भाग होण्यास आवडेल जे एखादी भूमिका घेतील. जे लोकांना खरा इतिहास सांगतील. त्याच्यासोबत छेडछाड करणार नाही. पण लोक म्हणतात हेच चालतं. ही एक नवी संकल्पना आहे जी हिट ठरत आहे. पण ही गंभीर बाब आहे”.

“लोकशाहीसाठी बॉलिवूड लढत नाही”
सैफन सांगितलं की, “लोकशाहीसाठी इंडस्ट्रीतील कोणालाही मी भांडताना पाहत नाही. पण विद्यार्थी लढत आहेत. बॉलिवूडमधील कोणीही भूमिका घेत नाही. कदाचित त्यांचा चित्रपटावर बंदी येण्याची भीती असते”.

“धर्मनिरपेक्षतेपासून दूर चाललो आहोत”
“देशातील सध्याची परिस्थिती पहून आपण धर्मनिरपेक्षतेपासून दूर चाललो आहोत असं वाटतं. त्याच्यासाठी कोणी लढतानाही मला दिसत नाही. अभिनेता या नात्याने कोणतीही भूमिका घेणं माझ्यासाठी योग्य नाही, कारण यामुळे माझ्या चित्रपटांवर बंदी येऊ शकते आणि त्याच्या कमाईवर प्रभाव पडू शकतो. बॉलिवूमधील लोकांना आपला व्यवसाय आणि कुटुंब संकटापासून दूर ठेवायचं असल्यानेच राजकीय प्रतिक्रिया देत नाहीत,” असंही सैफने सांगितलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक असणाऱ्या तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा भव्यदिव्य रुपात मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. दिग्दर्शक ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने तान्हाजीच्या माध्यमातून दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.