बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर त्याच्या कमाईच्या आकड्यांमध्ये झपाट्याने होणारी वाढ ही बाब आता नवी नाही. कोटीच्या कोटी उड्डाणं घेणाऱ्या चित्रपटांच्या कमाईचे हे आकडे वाढण्यात एका महत्त्वाच्या गोष्टीचा समावेश असतो. ती गोष्ट म्हणजे सॅटेलाईट राइट्स. सॅटेलाईट राइट्सची विक्री करत बऱ्याच चित्रपटांच्या कमाईमध्ये भर पडल्याचं आजवर पाहायला मिळालं आहे. अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपटही कमाईच्या बाततीत अशाच एका विक्रमाला गवसणी घालू शकण्याची चिन्हं आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी ‘रेस ३’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सलमानने त्याचे सॅटेलाईट राइट्स १५० कोटी रुपयांना विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या सॅटेलाईट राइट्सची ७० कोटींना विक्री करण्यात आली होती. त्यामुळे ‘रेस ३’ ची स्टारकास्ट पाहता निर्मात्यांनी राईट्स विकण्यासाठीचा आकडा दुप्पट केल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपट व्यवसायाशी निगडीत काही अहवालांनुसार सलमानचे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी चित्रपटांच्या कमाईमध्ये ६०- ते ६५ कोटी इतकी रक्कम सॅटेलाईट राईट्समुळे जमा होते. तेव्हा जर का आता सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या आणि सलमानच्या चित्रपटाचे सॅटेलाईट राईट्स १५० कोटींना विकले गेले तर, चित्रपटाचा निर्मिती खर्च पूर्णपणे भरुन निघेल असं म्हटलं जात आहे. त्याशिवाय बॉलिवूडमध्ये हा एक विक्रमच ठरणार आहे. तेव्हा आता सर्वांचच लक्ष सलमानच्या आगामी ‘रेस ३’कडे लागून राहिलं आहे.

https://www.instagram.com/p/BgfquB6FhfL/

वाचा : फ्लॅशबॅक : माधुरीचे ‘एक दो तीन…’ कायम १ नंबर

रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटातून सलमान खानशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, डेझी शाह आणि साकिब सलिम झळकणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कलाकाराच्या लोकप्रियतेचा फायदाही या चित्रपटाला होईल हे नाकारता येत नाही.