जवळपास २० वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवलं. सलमानच्या विरोधात निर्णय देत त्याला पाच वर्षे कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली. ज्यानंतर सलमानने जामीनासाठीही अर्ज केला होता. ज्याची सुनावणी शनिवारी करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान, २०१७ मध्ये या सर्व प्रकरणी देण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान, सलमानसमोर न्यायाधीशांनी त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं वाचन करुन दाखवलं होतं. त्यावेळी त्याला न्यायाधीशांनी जवळपास ६५ प्रश्न विचारले होते. ज्यापैकी ५७ प्रश्नांवर सलमानचं एकच उत्तर होतं. हे सर्वकाही चुकीचं आहे, हे एकच उत्तर सलमान वारंवार देत होता.

वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तू १ ऑक्टोबर १९९८ च्या रात्री कांकणी येथे काळवीटांच्या मागे जीप पळवत त्यांचा शिकार केला. त्यावेळी अभिनेता सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्याशिवाय दिनेश गरवारे आणि स्थानिक व्यक्ती दुष्यंत सिंहसुद्धा तुमच्यासोबतच होते, यावर तुझं काय म्हणणं आहे? या प्रश्नावर काहीच स्पष्टीकरण न देता, हे सर्व चूक असल्याचं सलमान सतत सांगत होता.

गावकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकणी मृतावस्थेत दोन काळवीट आढळले. मुख्य म्हणजे हे दोन्ही नर काळवीट होते, यावर तुझं काय म्हणणं आहे, असा प्रश्न सलमानला केला असता ‘हे सर्व चुकीचं आहे, मी शिकारच केली नव्हती’ याच उत्तरावर सलमान ठाम होता. एकामागोमाग सलमानवर बऱ्याच प्रश्नांचा मारा केला जात होता. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक क्षणाविषयी त्याला प्रश्न विचारण्यात येत होते. पण, हे सर्व चूक असून, तसं काहीच झालं नव्हतं अशाच उत्तरांवर तो तटस्थ असल्याचं पाहायला मिळाल्याचं वृत्त ‘दैनिक भास्कर’ने प्रसिद्ध केलं आहे.

वाचा : सलमानला गजाआड पाठणाऱ्या बिष्णोई समाजाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार १९९८ च्या १ आणि २ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आरोपी जीपमधून कांकणी सीमेवर गेले होते. तेथेच इतर उपस्थितांच्या सांगण्यावरुन दोन काळवीटांना गोळी मारुन त्यांची शिकार करण्यात आली, यावर तुम्ही काय सांगू इच्छिता? असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. ज्याचं उत्तर देताना सलमान म्हणाला की, मी त्या ठिकाणी चित्रीकरणासाठी गेलो होतो. तेथे चोख सुरक्षा व्यवस्थाही होती. अशा परिस्थितीत शिकार करणं तर दूरच पण, बाहेर पडणंही शक्य नव्हतं. प्रत्येक प्रश्नावर एकसारखी येणारी सलमानची उत्तरं पाहता आपला या प्रकरणात काहीच दोष नसल्याच्याच भूमिकेवर तो ठाम होता हे स्पष्ट होत आहे.